मंत्रालयाच्या दारात डेंगीचा डास 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जून 2019

मंत्रालय, विधानभवन परिसर आणि मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याच्या विधानभवन स्थानकात डेंगीच्या अळ्या सापडल्या आहेत. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांचे निवासस्थान असलेल्या "सुरुची' आणि "सुनिता' या इमारतींमध्येही डेंगी आणि मलेरियाचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.

मुंबई - मंत्रालय, विधानभवन परिसर आणि मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याच्या विधानभवन स्थानकात डेंगीच्या अळ्या सापडल्या आहेत. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांचे निवासस्थान असलेल्या "सुरुची' आणि "सुनिता' या इमारतींमध्येही डेंगी आणि मलेरियाचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाने मेट्रो रेल्वेला नोटीस पाठवली असून महापालिकेचे कीटकनाशक विभागही कामाला लागले आहे. 

या दोन इमारतीत दोन बड्या सरकारी अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना डेंगी आणि मलेरियाची लागण झाली आहे. संपूर्ण कुलाबा फोर्ट परिसरात डेंगीचे 23 रुग्ण आढळले आहेत. विधानभवनजवळच मेट्रो रेल्वेच्या प्रस्तावित स्थानकाचे काम सुरू आहे. येथे साचलेल्या पाण्यात डेंगी आणि मलेरियाचे डास सापडले आहेत. तसेच, विधानभवन परिसरातही अळ्या सापडल्या आहेत. लवकरच पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या कालावधीत या परिसरातील वर्दळही वाढेल. त्यामुळे साथीच्या रोगांचा धोकाही वाढू शकतो. विधानभवनातील उपहारगृहातही डेंगीच्या अळ्या सापडल्या आहेत. 

पालिकेने याप्रकरणी मेट्रोच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून त्यांना योग्य काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. 

तसेच, मेट्रोचे बांधकाम करणाऱ्या कंपनीला नोटीसही पाठवण्यात आली आहे. पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून युद्धपातळीवर मोहीम हाती घेण्यात आली आहे. 

स्वच्छतेच्या सूचना 
दर सात दिवसांत साचलेले पाणी रिकामे करावे, अशा सूचना दरवर्षीच पालिकेतर्फे केल्या जातात; मात्र त्याकडे सरकारी यंत्रणाच दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी मेट्रोच्या कामामुळे भूमिगत पर्जन्यवाहिन्या तुटल्या होत्या. त्याबाबतही पालिकेने नोटीस पाठवली होती. 

मंत्रालयाच्या परिसरात मेट्रो कामाच्या दोन ठिकाणी डासांच्या अळ्या सापडल्या आहेत. डेंगीचे दोन रुग्णही आढळले असून त्यांना डास मुंबईत चावला की मुंबईबाहेर हे स्पष्ट करणे अवघड आहे. 
- राजन नारिंग्रेकर,  किटकनाशक विभागाचे प्रमुख 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dengue mosquitoes at mantralaya