परदेशातील नोकरीच्या अामिषाने फसवणूक

परदेशातील नोकरीच्या अामिषाने फसवणूक
परदेशातील नोकरीच्या अामिषाने फसवणूक

नवी मुंबई : नेरूळमधील एका प्लेसमेंट  एजन्सीने परदेशातील नोकरीच्या प्रलोभनाने दोन तरुणांकडून प्रत्येकी ३ लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या फसवणुकीनंतर भारतीय दूतावासाच्या मदतीने या तरुणांनी प्लेसमेंट एजन्सीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या चौघांवर गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.  

फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव शशांक मोहिते (३२) असे असून, तो नवीन पनवेलमध्ये राहण्यास आहे. शशांकने हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजीचा कोर्स पूर्ण केल्याने तो नोकरीच्या शोधात होता. शशांकला परदेशात हॉटेल मॅनेजमेंटच्या संदर्भात विविध नोकऱ्या उपलब्ध असल्याबाबतचा ‘एडयुटाइम्स कन्सलटन्सी’ कंपनीकडून ई--मेल आला होता. त्यामुळे त्याने ‘एडयुटाईम्स कन्सलटन्सी’च्या नेरूळ सेक्‍टर-२३ येथील कार्यालयात जाऊन माहिती घेतली. कंपनीचे डायरेक्‍टर सिलीया डिसोझा व नुर शेख यांनी रशियामध्ये फोरस्टार, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हाऊस कीपिंग डिपार्टमेंटमध्ये ४२ हजार ते ६० हजार रुपयांची नोकरी लावून देण्याचे; तसेच तीन वर्षांचा वर्क परमिट व व्हिसा मिळवून देण्याचे कबूल केले. त्यामुळे शशांक मोहिते व त्याचा पुण्यातील मित्र सतपाल सिंग या दोघांनी प्रत्येकी अडीच लाख रुपये सिलीया डिसोझा व नुर शेख यांना दिले. ऑक्‍टोबर २०१८ मध्ये त्यांना रशियामध्ये पाठविण्यात आले. 

मात्र, त्या ठिकाणी गेल्यानंतर पॅराडाईज हॉटेल ऐवजी काशी विश्वानाथ यांच्या जयहिंद रेस्टॉरंटमध्ये दोघांना असिस्टंट कुक म्हणून कामाला ठेवण्यात आले. शशांक आणि सतपाल सिंग या दोघांनी त्या ठिकाणी दोन महिने काम केल्यानंतरदेखील त्यांना पगार मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी हॉटेल मालकाकडे विचारणा केल्यानंतर त्यांना इंटर्न (ट्रेनी) म्हणून कामाला ठेवण्यात आल्याचे व एक वर्ष त्यांना पगार मिळणार नसल्याचे हॉटेल मालक काशी विश्वानाथ याने सांगितले. त्यामुळे शशांकने सिलीया डिसोझा हिच्याशी संपर्क साधला असता, तिने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. हॉटेल मालक काशी विश्वानाथ धमकावून त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करुन घेत असल्याने दोघांनी तेथील भारतीय दूतावास कार्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांच्या मदतीने दोघे जानेवारी २०१९ मध्ये भारतात परतले. या दोघांनी नेरूळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी एडयुटाइम्स कन्सलटन्सीच्या डायरेक्‍टर सिलीया डिसोझा, नुर शेख, निखिल दत्याल व रशियातील त्यांची एजंट एलिना या चौघांविरोधात फसवणुकीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com