कांदळवनात भूमाफियांचा धुडगूस

कांदळवनात भूमाफियांचा धुडगूस

भाईंदर ः भाईंदर उत्तन येथील नवी खाडी पात्र व परिसरात भूमाफियांनी मोठया प्रमाणात कांदळवन तोडून बेकायदा भराव-बांधकामे सुरू केली आहेत. या भागात भूमाफियांनी घातलेल्या हैदोसाकडे महापालिका, महसूल व पोलिस प्रशासनाकडून जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बेकायदा बांधकामांमुळे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊ लागल्याच्या तक्रारींकडेही नागरिकांनी लक्ष वेधले आहे.

समुद्रकिनाऱ्यालगत असलेली उत्तनची नवी खाडी पालीपर्यंत पसरली असून या परिसरात दाट कांदळवन आहे. परंतु, काही वर्षांत उत्तन नाक्‍यापासून पालीपर्यंत या नवी खाडीपात्रात अगदी महापालिकेसह भूमाफियांनी भराव करून बेकायदा व्यावसायिक गाळे, बंगले बांधले आहेत. भराव व बांधकामे करताना येथील कांदळवनाच्या झाडांची मोठी कत्तल करण्यात आली आहे. या प्रकरणी पूर्वी महसूल विभागाने काही लोकांवर गुन्हेही दाखल केले होते. 

खाडीपात्र आणि कांदळवनात केलेल्या बांधकामांमुळे भरतीचे पाणी परिसरात आतपर्यंत येत आहे. तर पावसाळ्यात या परिसरात काही वर्षांपासून सतत पूरस्थिती निर्माण होत आहे. याविरोधात स्थानिक नागरिकांनी सातत्याने तक्रारी करूनही महापालिका, महसूल, पोलिस विभागाचे मात्र सोईस्कर दुर्लक्षच सुरू आहे.
या प्रकरणी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने व उपायुक्त डॉ. संभाजी पानपटट्टे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. तलाठी उत्तम शेडगे यांनी तक्रारीनंतर पाहणी करून वरिष्ठांना अहवाल दिल्याचे सांगितले.

तलाठी वा मंडळ अधिकारी कारवाई करत नसतील, तर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करू. भराव व बांधकामप्रकरणी माझ्यासह सहकारी नगरसेवक एलायस बांडया व नगरसेविका हेलन जॉर्जी यांनी सतत पालिका व आरोग्य विभागाकडे तक्रारी करूनही ते कारवाई करत नाहीत.
- शर्मिला गंडोली, नगरसेविका
-------------------
अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय कांदळवनाची कत्तल करून बेकायदा बांधकामे होणे शक्‍यच नाही. या बांधकामांना सुविधा मिळतात कशा? पर्यावरणासह आमची गावे वाचवायची असल्यास खाडीपात्रातील भराव व बेकायदा बांधकामे हटवायला हवीत. 
- जोजफ घोन्सालवीस, माजी नगरसेवक
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com