सूड घेण्यासाठी तिच्या पतीला पाठवली सेक्स क्लीप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

एका लॉजमध्ये भेटल्यावर लैंगिक संबंधांदरम्यान आरोपीने पीडित महिलेचे आक्षेपार्ह अवस्थेतील चित्रीकरण केले.

मुंबई : ३० वर्षीय महिलेची आक्षेपार्ह चित्रफीत तयार करून त्याचे स्क्रीन शॉट तिच्या पतीला पाठवणाऱ्या केंद्रीय गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याला पंतनगर पोलिसांनी अटक केली.

रूपेश कुमार (३४) असे अटक आरोपीचे नाव असून तो ॲण्टॉप हिल येथील केंद्रीय अधिकाऱ्यांच्या कॉलनीत राहतो. पीडित महिला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन विभागात कार्यरत होती. आरोपीही त्याच ठिकाणी कार्यरत असल्यामुळे मे २०१९ मध्ये त्यांची ओळख झाली. त्यानंतर दोघांत मैत्री झाल्यानंतर चेंबूर येथील एका लॉजमध्ये दोघे भेटले. त्या वेळी लैंगिक संबंधांदरम्यान आरोपीने पीडित महिलेचे आक्षेपार्ह अवस्थेतील चित्रीकरण केले.

त्यानंतर ऑगस्टमध्ये पीडित महिलेच्या पतीला या संबंधांबद्दल कळाले. दोघांमध्ये झालेल्या भांडणानंतर पीडित महिलेने आरोपीसोबत सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही आरोपी थांबला नाही. त्याने वारंवार दूरध्वनी करून पीडित महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. तिने आरोपीचा क्रमांक ब्लॉक केला असता त्याने इंटरनेट व गुगल कॉलद्वारे महिलेला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. 

पीडित महिलेने आरोपीला तिचा ई-मेल व त्याचा पासवर्ड सांगितला होता. आरोपीने सूड घेण्याच्या उद्देशाने या ई-मेलवरून तिच्या पतीला तिचे आक्षेपार्ह छायाचित्र आणि चित्रफीत पाठवली. त्यामुळे दाम्पत्याने पंतनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी विनयभंग व माहिती तंत्रज्ञान गैरवापर कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानुसार रूपेश कुमारला रविवारी पोलिसांनी अटक केली. पीडित महिलेची चित्रफीत असलेला मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

web title : Detective officer got arrested for sending pornography


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Detective officer got arrested for sending pornography