कर्जत पंचायत समितीवर हंडा मोर्चा नेण्याचा आदिवासी संघटनेचा निर्धार

neral.
neral.

नेरळ - कर्जत तालुक्यातील नेरळ जवळील दामत ग्रामपंचायतमध्ये असलेल्या भडवळवाडी मध्ये नळपाणी योजनेचे पाणी पोहचत नाही.त्यामुळे विहिरीवर हांडे घेऊन जमलेल्या आदिवासी महिलांना कर्जत तालुका आदिवासी संघटनेने थांबवून ठेवले आणि पुढील आंदोलन स्थगित झाले.दरम्यान,आदिवासी संघटना आता सर्व आदिवासी वाद्यांमधील पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन कर्जत पंचायत समितीवर हंडा मोर्चा नेऊन मनातील खदखद व्यक्त करणार आहेत.

दामत ग्रामपंचायत मध्ये असलेल्या भडवळवाडी मधील आदिवासी लोकांना पाणीपुरवठा करणारी एक विहीर कोसळली असून दुसरी विहीर कोरडी पडली आहे.त्यात वाडीसाठी पाणीपुरवठा करणारी नळपाणी योजनेचे पाणी भडवळवाडीमध्ये पोहचत नाही. परिणामी आदिवासी वाडीमधील महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी खासगी फार्महाऊस यांचा सहारा घ्यावा लागत आहे. गेली दीड महिन्यापासून ही स्थिती भडवळवाडीत निर्माण झाली असून भडवळ वाडीतील महिला संतप्त होऊन 25मार्च रोजी दामत ग्रामपंचायतवर हांडे मोर्चा घेऊन निघाल्या होत्या. 50च्या आसपास आदिवासी महिला आणि त्यांच्या सोबत तरुण मंडळी आणि शालेय विद्यार्थी यांनी ग्रामपंचायत कार्यालय बाहेर मोर्चा नेऊन ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार केला होता.

मात्र याबाबत कर्जत तालुका आदिवासी ठाकूर कातकरी संघटनेला माहिती मिळताच संघटनेचे काही पदाधिकारी भडवळवाडी मध्ये पोहचले.तेथे भडवळ वाडीमधील महिलांनी घेतलेले आक्रमक रुप पाहून काहीवेळ आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते देखील स्तब्ध झाले.

आदिवासी संघटनेचे जैतु पारधी, वसंत ढोले, सुनील पारधी या पदाधिकारी यांच्यासह जेष्ठ कार्यकर्ते शेंडे, दत्ता निर्गुडा, लक्ष्मण उघडा यांनी महिलांची समजूत काढली. मात्र शांताबाई वाघ, गंगुबाई शिंगवा, मीनाक्षी पारधी यांनी महिलांना पाणी आणण्यासाठी होणारे हाल याबाबत आपली भूमिका सांगण्यास सुरुवात केल्यानंतर मात्र आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते शांत झाले. शेवटी या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतचे पाणी पोहचत नसल्याबद्दल जाब विचारू, पण शाळांच्या परीक्षा सुरू झाल्याने ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर बसून ठिय्या आंदोलन करू नये असे जैतु पारधी यांनी सांगितल्याने महिला काही प्रमाणात शांत झाल्या. शेवटी भडवळवाडी सारखी पाणी समस्या संपूर्ण कर्जत तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्यांमध्ये असल्याने आदिवासी संघटना तालुक्याचा हंडा मोर्चा काढून शासनाचा निषेध करील असे जाहीर करण्यात आले.त्यामुळे आक्रमक झालेल्या महिला शांत झाल्या असून, त्यांनी त्यानंतर भर उन्हात खासगी बोअरवेल वर जाऊन पाणी घेतले आणि पाण्याने भरलेले हांडे आपल्या घरी नेण्याचे काम केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com