वरळी कोळीवाड्याला विकासाचे वेध

वरळी कोळीवाड्याला विकासाचे वेध

तीन बाजूंनी समुद्राने वेढलेल्या वरळी कोळीवाड्यात एक लाख २० हजार ७५ चौ. यार्ड वारसलॅण्ड व तेवढाच म्हणजे सुमारे एक लाख ९४ हजार ७५२ आजूबाजूचा परिसर आहे. 

वरळी सी-फेसमुळे परिसरातील इमारतींचे भाव कोटींची उड्डाणे घेत असताना त्यांच्यापेक्षा चांगले ‘लोकेशन’ असल्याने वरळी कोळीवाड्याची जागा सोन्याची कोंबडी ठरत आहे. पण गेल्या काही दिवसांतील घडामोडींमुळे कोळीवाड्याच्या अस्तित्वाचाच प्रश्‍न उपस्थित झाला आहे. सीआरझेडमुळे विकासाला मर्यादा असल्यामुळे तो नेमका कसा होईल याबाबतही स्थानिकांमध्ये संभ्रम आहे. 

घरमालक व पागडी पद्धतीने त्यांच्याकडून घरे घेतलेले भाडेकरू असे दोन प्रवाह वरळी कोळावाडा परिसरात आहेत. येथील आद्य नागरिक असलेल्या सुमारे ४५७ घरमालकांच्या या परिसरात मोठ्या जागा आहेत. त्यांची राहती घरेही खूप मोठी आहेत. तसेच मासळी सुकवण्यासाठी त्यांच्या परंपरागत जमिनीही आहेत. त्यांना खळ म्हणून संबोधतात. या परिसराला झोपडपट्टीचा दर्जा मिळाल्यास आपण देशोधडीला लागू, अशी भीती या वर्गाला वाटते. त्यांनाही विकास हवा आहे, कारण मालमत्ता कराच्या रूपाने त्यांना भरावी लागणारी रक्कम जास्त व त्याच्या तुलनेत भाडेकरूंकडून मिळणारे भाडे कमी आहे. काही जुन्या भाडेकरूंकडून तर फक्त १० ते १०० रुपये भाड्याच्या रूपाने मालकांना मिळतात. त्यातून परंपरागत मासेमारीचा व्यवसाय डबघाईला आल्यामुळे अनेक घरमालकांचे मिळकतीचे स्रोत आटले आहेत. 

कोळीवाड्यातील दुसरा गट पागडीवर राहणाऱ्या भाडेकरूंचा आहे. परिसरातील २५ हजार मतदारांमध्ये ८० टक्के भाडेकरू आहेत. छोट्या छोट्या घरात दाटीवाटीने राहणाऱ्या या गटालाही प्रकर्षाने विकासाचे वेध लागले आहेत. छोट्या छोट्या घरांमध्ये वास्तव्याला असलेल्या दोनतीन भावंडांची कुटुंबे सद्यस्थितीत घराची वाटणीही करू शकत नाही. आता घरे विकल्यास काही रक्कम घरमालकाला दिल्यास हाती काहीच उरत नाही. त्यामुळे परिसराचा विकास झाल्यास इमारतींमधील या घरांना चांगला भाव मिळेल. ते विकल्यास कुठे तरी मुंबईला लागून असलेल्या परिसरात घर घेणे शक्‍य होईल, अशा आशेवरही काही कुटुंबे आहेत. परिसरातील घरमालक व भाडेकरूंच्या अपेक्षा व इच्छा वेगळ्या असल्यामुळे परिसरातील विकासाचा गुंता सोडवणे तेवढे सोपे नाही. त्यातच बिल्डर दोन्ही बाजूंना गळ घालत असल्यामुळे आता तरी या दोन्ही गटांनी एकत्र आले पाहिजे; अन्यथा दोन मांजरांच्या गोष्टीमध्ये सगळी मलई माकड खाते अशी अवस्था होईल. या परिसरातील सर्वांचा विरोध उधळवत झालेला एक एसआरए प्रकल्प याचे द्योतक आहे. त्यात भाडेकरूंच्या वाट्याला आलेली खोपटी पाहून तरी शहाणपण आले नाही, तर तीच अवस्था संपूर्ण कोळीवाड्याची होण्यास वेळ लागणार नाही.

माझाच बिल्डर आला पाहिजे!
वरळी कोळीवाड्यात प्रत्येक गल्लीत एक पुढारी आहे. त्यातील अनेकांनी एव्हाना अनेक बिल्डरांच्या पायऱ्याही झिजवून संबंधित परिसरातील नागरिकांचे बहुमत आपल्याशिवाय कोणी मिळवून देऊ शकत नाही अशी शेखी बिल्डरसमोर मिरवली आहे. अनेक घरमालकांनी वेगळ्या चुली मांडल्या आहेत. त्यातील अनेकांनी तर बिल्डरांशी तोंडी व लेखी अशा दोन्ही पद्धतीने ‘डील’ केले आहे. त्याचे फलित त्यांना दर महिन्याला घरबसल्या मिळते. त्यामुळे तो करू शकतो, तर मग आपणही परिसरातील गट करून मलई लाटू शकतो, असे मानणाऱ्या महाभागांची संख्याही वाढत आहे. त्यातून परिसरातील अनेक ठिकाणी बोर्ड लागलेत; पण येथील सामान्य नागरिक या सर्व अर्थपूर्ण संबंधांबाबत अनभिज्ञ आहेत. एखाद्या राजकीय पक्षाप्रमाणे बिल्डरच्या या गटातून त्या गटात उड्या मारणारेही अनेक ठकसेन आहेत. ही सर्व मंडळी परिसरातील विकासासाठी भविष्यात मोठा अडसर ठरणार असून कोट्यवधींच्या मलईसाठी अशांकडून परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍नही उभा राहील यात शंका नाही.

आमचा विकास आम्ही करण्यास सक्षम
वरळी कोळीवाड्याचा परिसर गावठाण असल्यामुळे परिसरात नऊ पाटील जमात आणि इस्टेट कमिटीलाही मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांचाही सर्वांना एकत्र घेऊन विकास करण्याचा मानस आहे. त्याबाबत या कमिटीतील एक असलेले विजय वरळीकर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता आमचा विकास करण्यासाठी आम्ही सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले. वरळीच नाही, तर मुंबईतील सर्व कोळीवाड्यांचे लचके तोडण्याचा प्रकार बिल्डर लॉबी करत आहे. त्यांनी विणलेल्या या पैशांच्या चक्रव्यूहामध्ये कोळी समाजाला अभिमन्यूप्रमाणे अडवकण्याचा प्रयत्न आहे असे ते म्हणाले.

अफवांऐवजी कायदा जाणून घ्या
विकासाचा मुद्दा या परिसरात ऐरणीवर आल्यामुळे त्याबाबतच्या अफवाही वणव्याप्रमाणे पसरतात. हा बिल्डर आला, तो बिल्डर आला, तो एवढी जागा देतोय, तो बिल्डर एवढं भाडं देणार आहे... असे चर्चांचे फड परिसरात रंगत आहेत. एसआरएचा हा फायदा... खासगी विकास झाला, तर इतका फायदा याबाबतच्या कल्पनाही नागरिकांसाठी आता नव्या राहिल्या नाहीत. त्यातून परिसरात अनेक गैरसमज परसरले आहेत. तसेच अनेक गटांकडून अशा बातम्या जाणूनबुजूनही पसरवल्या जात आहेत. त्यामागची आर्थिक गणिते आधीच ठरली आहेत. त्यातून परिसरातील नागरिकांना आमिष दाखवून स्वाक्षऱ्या घेण्याचेही प्रकार सुरू आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींवर विश्‍वास ठेवण्यापेक्षा कायदेशीर सल्ला घेऊनच नागरिकांनी कोणतेही पाऊल उचलावे, असा सल्ला जाणकार देत आहेत.

कोळीवाड्याचे वास्तव
 १२५ एकरची अवाढव्य जागा
 सी लिंकसमोरचे मोक्‍याचे लोकेशन
 ४५७ घरमालक
 एक लाख भाडेकरूंचे वास्तव्य
 जुन्या भाडेकरूंचे भाडे १० ते १०० रु.
 मालक-पुढारी यांचे अनेक गट-तट
 आर्थिक लागेबांधे व कायद्यांपासून सामान्य अनभिज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com