महत्त्वाच्या बैठका हाच वाढदिवसाचा कार्यक्रम

सकाळ न्यूज नेटवर्क 
सोमवार, 22 जुलै 2019

वसंतराव नाईक यांच्यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदावर सर्वाधिक काळ असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस "नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन,' या विश्‍वासाने पुढील वाटचालीस सज्ज झाले आहेत, अगदी वाढदिवसाच्या दिवशीही कामांचा धडाका लावत!

मुंबई - वसंतराव नाईक यांच्यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदावर सर्वाधिक काळ असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस "नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन,' या विश्‍वासाने पुढील वाटचालीस सज्ज झाले आहेत, अगदी वाढदिवसाच्या दिवशीही कामांचा धडाका लावत!

फडणवीस वाढदिवस कधीच साजरा करत नाहीत, केकही कापत नाहीत. आई सरिता, पत्नी अमृता यांच्या आग्रहामुळे औक्षण तेवढे होते अन्‌ कार्यकर्त्यांनी केक आणलाच, तर तो कन्या दिवीजा कापते. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने उद्या (ता. 22) होणारा पन्नासाव्या वर्षातील प्रवेशाचा वाढदिवस नेहमीसारखाच असेल, उलट अधिक कामाचा असेल. पाणीपुरवठा प्रश्‍न, पीक आढावा अशा महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या प्रश्‍नांसंबंधी उद्या बैठका होणार आहेत.

भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात प्रथमच मुख्यमंत्रिपद मिळाले ते फडणवीस यांच्या रूपाने. या पक्षात निवडणुकांचे नेतृत्व करीत पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा मान नरेंद्र मोदी, शिवराजसिंह चौहान, डॉ. रमणसिंह अशा नेत्यांनी मिळवला आहे. या पंक्तीत जाण्याचा मान मिळविण्याची त्यांची इच्छा आहे.

'प्रत्येक आव्हानाचे संधीत रूपांतर करण्यात ते यशस्वी होतील. माझ्यापेक्षा पाच वर्षाने लहान असलेल्या या सहकाऱ्याने आज जे साध्य केले आहे, त्याहीपेक्षा मोठे सन्मान त्यांना मिळोत या शुभेच्छा,'' असा विश्‍वास मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्‍त केला.

वाढदिवसाला हारतुरे, गुच्छ स्वीकारण्यास फाटा देत फडणवीस यांनी हा निधी मुख्यमंत्री मदत निधीत समाविष्ट करावा, असे आवाहन केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis Birthday