पाच कोटींच्या निधीला माझा विरोध होता : फडणवीस

पीटीआय
मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016

येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत असलेल्या "ए दिल है मुश्‍किल' या चित्रपटात पाकिस्तानी कलाकार फवाद खान याला घेतल्याने मनसेने या चित्रपटाला विरोध केला होता. या सर्व पार्श्‍वभूमीवर गेल्या शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी "वर्षा' निवासस्थानी या चित्रपटाचे निर्माते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बोलावले होते

मुंबई : "ऐ दिल है मुश्‍किल' चित्रपटाच्या प्रदर्शनावरून मध्यस्थी केल्याबद्दल टीका होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यातून सावरण्याचा प्रयत्न केला. ""सैन्य कल्याण निधीला पाच कोटी रुपये द्यावेत, या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला माझा विरोध होता; पण, निर्मात्यांनीच ती मागणी मान्य केली,'' असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्याच्या प्रमुखाने फुटिरतावाद्यांशी चर्चा केल्याचीही उदाहरणे आहेत, असा युक्तिवाद देवेंद्र फडणवीस यांनी केला.

येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत असलेल्या "ए दिल है मुश्‍किल' या चित्रपटात पाकिस्तानी कलाकार फवाद खान याला घेतल्याने मनसेने या चित्रपटाला विरोध केला होता. या सर्व पार्श्‍वभूमीवर गेल्या शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी "वर्षा' निवासस्थानी या चित्रपटाचे निर्माते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बोलावले होते.

बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी एकूण तीन मागण्या निर्मात्यांपुढे ठेवल्या. त्यापैकी दोन मागण्यांनाच कोणचाच विरोध नव्हता; पण, जेव्हा पाच कोटी रुपयांचा विषय आला, त्या वेळी मी त्याला विरोध केला. कोणतीही मदत स्वेच्छेनेच केली पाहिजे. अशा पद्धतीने बळजबरी केली जाऊ शकत नाही, असे मी त्या वेळी स्पष्ट केले होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Web Title: Devendra Fadnavis clears air on Ae Dil Hai Mushkil