
Devendra Fadnavis : ‘औरंगजेबाचे उदात्तीकरण अचानक कसे?’...काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मुंबई : महाराष्ट्रात अचानक औरंग्याच्या एवढ्या अवलादी आल्या कुठून, असा प्रश्न करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात झालाच तर जनमानस अस्वस्थ होते, असे आज नमूद केले. मात्र, क्षोभ व्यक्त करण्यासाठी कायदा हातात घेणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही, असेही ते म्हणाले.
फडणवीस म्हणाले, की विरोधी पक्षातील एक नेता कोल्हापुरात म्हणतो की दंगल होण्याची शक्यता आहे अन् लगेच दंगलसदृश वातावरण निर्माण होते. हा काय प्रकार आहे? औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या फौजा तयार झाल्या आहेत का, औरंगजेबाची छायाचित्रे स्टेट्स ठेवण्याचा प्रकार कुणी केला, कुणाच्या इशाऱ्यावरून हे होतेय का, यामागे कुणी मास्टरमाईंड आहे, असे प्रश्न आहेत. याबद्दल तपासात काही बाबी आढळल्या आहेत पण त्या योग्य वेळी जाहीर करेन, असेही त्यांनी नमूद केले.
वातावरण बिघडविण्याचे कुणाचे प्रयत्न
औरंगजेब आणि टिपू सुलतान यांच्या संबंधातील पोस्ट कुठून सुरु झाल्या, असा प्रश्नही त्यांनी केला. उद्योगप्रधान राज्यात हे घडू नये. मात्र, कायदा हातात घेण्याच्या अशा प्रकारामुळे महाराष्ट्राचा लौकिक डागाळला जाईल, अशी काळजीही त्यांनी व्यक्त केली.
कायदा व सुव्यवस्था परिस्थितीत बिघाड निर्माण व्हावा यासाठी कुणी प्रयत्न तर करत नाहीये ना, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. पोलिस योग्य ती कारवाई करीत आहेत. कायदा हाती घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असेही ते म्हणाले.