गुजरातला मागे टाकू; देवेंद्र फडणवीस

फडणवीस यांचा विश्‍वास; ‘मविआ’वर टीका
Devendra Fadnavis criticize mahavikas aghadi govt gujrat Vedanta-Foxconn project business mumbai
Devendra Fadnavis criticize mahavikas aghadi govt gujrat Vedanta-Foxconn project business mumbaiTeam eSakal

मुंबई : ‘महाराष्ट्राने २०१९ साली २६ अब्ज डॉलरची गुंतवणूक खेचून आणत औद्योगिकरणात आघाडीवर असलेल्या गुजरात, दिल्ली, कर्नाटक आणि तमिळनाडू या चारही राज्यांतील एकत्रित गुंतवणुकीलाही मागे टाकले होते. मात्र गेल्या दोन वर्षांतील कारभारामुळे आपण माघारले आहोत. आता पुढील दोन वर्षांत महाराष्ट्र गुजरातला मागे टाकेल,’ असा विश्‍वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

‘वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राज्यात राजकीय वादळ उठले आहे. राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याने हा प्रकल्प हातातून गेल्याची प्रखर टीका विरोधक करत आहे. या पार्श्वभूमीवर रशियातून परतलेले उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लघू उद्योग भारतीने आयोजित केलेल्या मेळाव्यात विरोधकांवर उलटवार केला.

‘‘वेदांतचा प्रकल्प चालढकल झाल्याने तिकडे गेला. जगातील सर्वांत मोठी रिफायनरी ठरणारा पाच लाख रोजगारांची निर्मिती करणारा प्रकल्पही विरोधाचा धनी झाला. भारतात होणारी विक्रमी गुंतवणूक सरकारी कंपन्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात होणार होती, पण तरीही या प्रकल्पाला विरोध झाला. विकास रोखला गेला,’ असा घणाघात फडणवीस यांनी शिवसेनेचे नाव न घेता केला. ते म्हणाले, ‘केवळ गुजरातला नावे ठेवून काही होत नाही, तसे उद्योगस्नेही वातावरण निर्माण करावे लागते. आता पुढील दोन वर्षांत गुजरातला महाराष्ट्र मागे टाकेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जामनगर रिफायनरी आणि मुंद्रा बंदर या दोनच गोष्टींमुळे गुजरातची औद्योगीकरणाची मानके वाढतात, महाराष्ट्रातले वाढवण बंदर नैसर्गिक क्षमतेमुळे सर्वाधिक व्यवसाय ओढू शकते, आमचे सरकार हे करुन दाखवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आमचे सरकार आल्यावर मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांतशी पुन्हा एकदा संपर्क करुन दुसरा टप्पा येथे आणण्याच्या हालचाली केल्या, पायाभूत गुंतवणूक वाढावी यासाठी करार केले, असेही त्यांनी सांगितले.

औद्योगिक विकास मंडळाचे वाभाडे

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाच्या कारभारावर देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला आहे. या मंडळात चार ते पाच दलाल काम करीत होते. त्यांची नावे घोषित करता येतील. जागा कुणी बळकावल्या, तेथे पुढे काय झाले, याची चौकशी करु, असेही ते म्हणाले. भ्रष्ट अधिकाऱ्यांना ताबडतोब घरी पाठवले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

उद्धव ठाकरे कोणत्याही प्रकारचे काम करीत नाहीत. ते नुसते ‘मातोश्री’त बसून रहातात. त्यांच्या पापामुळे प्रकल्प बाहेर गेला. ‘वेदांत’कडे आदित्य ठाकरे यांनी काय मागणी केली होती, ते लवकरच कळेल.

- नारायण राणे, केंद्रीय मंत्री

आमचे सरकार २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर दोन वर्षात आम्ही राज्याला क्रमांक एकवर नेले. २६ हजार अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली. गेल्या अडीच वर्षांत ती १८ अब्ज डॉलरवर घसरली. तत्कालीन सरकारची अनास्था त्या मागचे कारण होती.

- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com