गुप्तेश्वर पांडे यांना तिकीट न मिळण्याचे प्रयत्न फडणवीसांनी करावेत, सचिन सावंत यांची मागणी

कृष्णा जोशी
Monday, 28 September 2020

बिहारचे माजी पोलिस अधिकारी गुप्तेश्वर पांडे यांना तेथील विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळू नये, यासाठी बिहार भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्य काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केले आहे. 

मुंबई:  सुशांतसिंह राजपूत तपास प्रकरणात महाराष्ट्राची आणि मुंबई पोलिसांची बदनामी करणारे बिहारचे माजी पोलिस अधिकारी गुप्तेश्वर पांडे यांना तेथील विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळू नये, यासाठी बिहार भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्य काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केले आहे. 

पांडे यांनी पोलिस सेवेतून मुक्त होऊन जनता दल (यू) मध्ये प्रवेश केला आहे. हा पक्ष बिहारमध्ये भाजपचा सहयोगी पक्ष असून तो पक्ष पांडे यांना निवडणुकीत उमेदवारी देण्याची शक्यता आहे. बिहारच्या निवडणुकांच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या असून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बिहारचे भाजप प्रभारी या नात्याने तेथे प्रचारासाठी आणि तयारीसाठी तळ ठोकून आहेत. त्यामुळे सावंत यांनी त्यांना हे आवाहन केले आहे. 

सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सुरु असताना पांडे यांनी आपल्या विधानांद्वारे मुंबई पोलिसांचा अवमान केला होता. त्यामुळे आता फडणवीस हे बिहार भाजपचे प्रभारी असताना त्यांचा सहयोगी पक्ष जर पांडे यांना उमेदवारी देणार असाल तर ते महाराष्ट्राच्या जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे होईल,  असे झालेच तर ती दुर्दैवी घटना होईल आणि त्यामुळे फडणवीस यांनी या प्रकाराला विरोध करावा, अशी अपेक्षा असल्याचेही सावंत यांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. 

पांडे यांना निवडणुकीत उमेदवारी मिळणार नाही यासाठीही फडणवीस यांनी प्रयत्न करावेत. या प्रयत्नांना त्यांनी निकराने विरोध करावा, किंबहुना पांडे यांना उमेदवारी मिळू नये ही फडणवीस यांचीच जबाबदारी राहील. तरीही पांडे यांना उमेदवारी मिळालीच तर फडणवीस यांना महाराष्ट्रातील जनतेच्या असंख्य प्रश्नांना तोंड द्यावे लागेल हे ध्यानात ठेवावे, अशी आठवणही सावंत यांनी करून दिली आहे.

------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Devendra Fadnavis should try not to get ticket Gupteswar Pandey demands congress


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis should try not to get ticket Gupteswar Pandey demands congress