कांदा निर्यात बंदी: देवेंद्र फडणवीसांचं केंद्र सरकारला पत्र लिहून साकडं

पूजा विचारे
Wednesday, 16 September 2020

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने  यासंदर्भात अधिसूचना जारी करत याबाबतची माहिती दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कांदा निर्यात बंदीवरुन केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. 

मुंबईः  केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने  यासंदर्भात अधिसूचना जारी करत याबाबतची माहिती दिली. या निर्णयानंतर सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर त्वरीत बंदी घालण्यात आली आहे.  केंद्र सरकारच्या निर्णयाचे पडसाद देशभरात उमटत आहेत. तसंच महाराष्ट्रातूनही याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. त्यातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कांदा निर्यात बंदीवरुन केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. 

फडणवीस यांनी हे पत्र केंद्रिय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांना लिहिलं आहे. या पत्रात फडणवीसांनी कांदा निर्यात बंदी तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे. 

 

पत्रात फडणवीसांनी म्हटलं की, कांदा निर्यात बंदीवरुन दूरध्वनी या विषयावर आपल्यासोबत विस्तृत संभाषण झालं. या संभाषण मी तुम्हाला कांदा निर्यात बंदीवरील निर्बंध तात्काळ मागे घेण्यासाठी विनंती केली होती. मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की, निर्यातीवरील बंदी तात्काळ मागे घेण्यात यावी. महाराष्ट्रातील कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी आहे. तसंच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला त्यातून चांगला नफा देखील होतो. कांदा निर्यातीवर बंदी आणल्यानं शेतकरी वर्ग खूप दुखावला आहे. मला अपेशा आहे की, तुम्ही यावर नक्कीच लवकरात लवकर निर्णय घ्याल. 

देशात कांद्याचे दर वाढले आहेत आणि देशांतर्गत बाजारात कांद्याची कमतरता आहे. ही कमतरता हंगामी आहे. पण कोरोना व्हायरसच्या संकटात गेल्या काही महिन्यांत कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात केला गेला. एप्रिल ते जून या कालावधीत भारताने १९.८ कोटी डॉलर कांद्याची निर्यात केली.  गेल्या वर्षी ४४ कोटी डॉलरपर्यंत कांद्याची निर्यात झाली होती. कांद्याची सर्वाधिक निर्यात भारतातून बांगलादेश, मलेशिया, युएई आणि श्रीलंका येथे केली जाते.

अधिक वाचाः  ज्येष्ठ नागरिकांच्या क्वांरटाइन संदर्भात मोठी अपडेट, पालिकेनं बदलला नियम

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या विषयावर पियूष गोयल यांच्याशी तातडीनं चर्चा केली. या आकस्मिक निर्णयामुळं निर्यातदार देश म्हणून भारताच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता असल्याची भीती पवारांनी व्यक्त केली आहे.

Devendra Fadnavis Wrote Letter Piyush Goyal regarding ban onion export


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis Wrote Letter Piyush Goyal regarding ban onion export