बालयोगी सदानंद बाबांच्या भक्तांनी रोखला हायवे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

वसईच्या तुंगारेश्वर घनदाट जंगलातील बालयोगी सदानंद बाबा यांच्या आश्रमावर सुरू असलेल्या तोडक कारवाईविरोधात शेकडो भक्तांनी रस्त्यावर उतरून 3 तास मुंबई अहमदाबाद महामार्ग रोखून धरला होता.

नालासोपारा : वसईच्या तुंगारेश्वर घनदाट जंगलातील बालयोगी सदानंद बाबा यांच्या आश्रमावर सुरू असलेल्या तोडक कारवाईविरोधात शेकडो भक्तांनी रस्त्यावर उतरून 3 तास मुंबई अहमदाबाद महामार्ग रोखून धरला होता. आज सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत 500 च्या वर नागरिकांनी प्रशासनाचा निषेध करीत वर्सोवा ब्रिजजवळील फाउंटन चौकात रास्तारोको करून आपल्या उद्रेकाला वाट मोकळी करून दिली. या वेळेत मुंबई आणि गुजरात या दोन्ही लेनवर 10 ते 15 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाल्याने शेवटी ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक शिवाजी राठोड यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांसोबत मध्यस्थी करून आंदोलन शांत केले आणि 3 तासानंतर महामार्ग खुला केला असता वाहनधारकांनी सुटकेचा श्वास सोडला.

सोमवारपासून सदानंद बाबांच्या आश्रमावर वन्यजीव संरक्षण विभागामार्फत तोडक कारवाई सुरू आहे. तेथील धर्मशाळा तोडल्याच्या नंतर बाबांच्या भक्तात तीव्र आक्रोश निर्माण झाला आहे. संतप्त झालेल्या वसई, मिरारोड, भाईंदर येथील आगरी समाजाचे शेकडो भाविकांनी आज (शुक्रवार) जागोजागी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा फाउंटन चौक येथे सकाळी 10 ते 1 पर्यंत सरकार, प्रशासनाचा निषेध करीत तीव्र आंदोलन छेडले. यामुळे फाउंटन ते मुंबईच्या दिशेने गुजरात लेनवर दहिसर चेक नाका, मुंबई लेनवर वसई फाटा, ठाण्याच्या दिशेने चेना पर्यंत 10 ते 12 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या . त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला. आश्रमावर चालू असलेली कारवाही तात्काळ थांबवावी अशी मागणी यावेळी आंदोलन कर्त्याकडून करण्यात येत होती.

आश्रम परिसरातील मंदिराच्या समोरच औषद भांडार, पुस्तकालाय तोडताना इमारत चक्क पोकलंड वर पडल्याने पोकलंड चालक यात गंभीर जखमी झाला आहे. त्याला तात्काळ तेथून रुग्णालयात पाठवून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

आज सकाळपासून वसई विरार नालासोपाऱ्यात विविध ठिकाणी भाविकांकडून आंदोलन करण्यात आले. नायगाव येथे स्टेशन परिसरात रिक्षा बंद केल्या होत्या, नालासोपारा आचोले येथे नालासोपारा वसई रोड जाणारा मुख्य रस्त्यावर 1 तास रस्ता रोको केला, विरार मध्ये ग्लोबल सिटी परिसरात , विरार पूर्व साईबाबा मंदिरा जवळ ही 1 तास रास्तारोको करण्यात आला. वसई ताल्युक्‍यात अनेक ठिकाणी भाविक रस्त्यावर उतरत असल्याने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची मात्र मोठी दमछाक झाली आहे.

विरार पूर्व पारोळा परिसरात सदानंद बाबांच्या आश्रमाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सकाळी एक हजाराच्या वर नागरिक रस्त्यावर उतरले होते. पण पोलिसांनी तात्काळ गांभीर्य ओळखून संतप्त होत चाललेल्या नागरिकांना हटवण्याचा प्रयत्न केला. पण नागरिकांचा उद्रेक वाडतानाचे पाहून त्या ठिकाणी सौम्य लाठीचार्ज करून नागरिकांना पळवावे लागले. त्यामुळे काहीवेळ त्याठिकाणी तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती.

वसई ताल्युक्‍यातील ग्रामीण भागात सगळीकडे पोलिसच दिसत असल्याने आणि जागोजागी आंदोलन होत असल्याने या परिसराला दंगलसुदृश्‍य स्वरूप आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devotees of Balyogi Sadanand Baba protest against Ashram action