धारावीच्या किल्ल्यावर स्वच्छता मोहीम सुरू

धारावी - रेवा किल्ल्यावर रविवारी स्वच्छता मोहीम सुरू झाली.
धारावी - रेवा किल्ल्यावर रविवारी स्वच्छता मोहीम सुरू झाली.

मुंबई - शहरातील किल्ल्यांची दुरवस्था आणि बकालपणा दूर करण्यासाठी चंग बांधलेल्या संगम प्रतिष्ठानने सायन किल्ल्यानंतर आता धारावीचा रेवा किल्ला स्वच्छ आणि सुंदर करण्याची मोहीम आजपासून सुरू केली.

एकेकाळी शत्रूचे आक्रमण परतवणारे हे किल्ले आता शेवटच्या घटका मोजत आहेत. शहरातील अनेक किल्ल्यांवर झोपड्यांची किंवा दारूड्या, गर्दुल्ल्यांची आक्रमणे झाली आहेत. या किल्ल्यांच्या सौंदर्यीकरणासाठी कोमल घाग, तानाजी घाग यांनी आपल्या मित्रांसह स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी सहा महिने सायन किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवली. तेथील प्रेमवीरांची नावे पुसून टाकली.

इतकेच नव्हे, तर परिसरात झाडे लावून सौंदर्यीकरणही केले. तेथील कचऱ्यापासून कम्पोस्ट खत तयार करण्यासाठी खड्डेही केले. त्यानंतर संगम प्रतिष्ठानने आजपासून धारावी येथील काळा किल्ल्यावर स्वच्छता मोहीम सुरू केली.

इंग्रजांनी १७६७ मध्ये दारूगोळा साठवण्यासाठी आणि इतर किल्ल्यांवर जाण्यासाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून शहराच्या मध्यावर आणि दुर्लक्षित खाडीत हा किल्ला बांधला. पुढे खाडी बुजली, शहर वाढले, झोपड्या वाढल्या. त्यामुळे ही पुरातन वास्तू टिकाव धरेल की नाही, अशी परिस्थिती आहे.

म्हणूनच हा किल्ला जपण्यासाठी सकाळी ९.३० वाजल्यापासून ही मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत संगम प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसोबत कीर्ती कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले. या मोहिमेला पुरातत्त्व विभाग, मुंबई महापालिका आणि स्थानिक नगरसेविका गंगा कुणाल माने यांचे सहकार्य लाभले.

११ आठवडे चालणार मोहीम
पुढील ११ आठवडे दर रविवारी सकाळी ही मोहीम राबवण्याचा संगम प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांचा निर्धार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्याबरोबर किंवा त्यांची स्मारके उभारण्याबरोबरच आपल्या शहरातील हा ऐतिहासिक ठेवा जपला तर ती मोठीच कामगिरी ठरेल. त्यासाठी तरुणांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असे मत या मोहिमेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com