कलाकुसरीची घुसमट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

घसा कोरडा पडलेला असताना माठातले थंडगार पाणी मिळाले तर ते कोणाला नको असेल? पण, हे माठ तयार होत असताना अनेक कामगार अन्‌ त्यांचे कुटुंबीय चांगलेच चटके सोसत असतात. कुंभारवाड्यातील धुरामुळे त्यांची होणारी घुसमट क्वचितच कधी पाहायला, ऐकायला वा वाचायला मिळते... धारावीतील कुंभारवाडा असेच कष्टाचे जगणे घेऊन रोज जगतोय. पिढीजात व्यवसाय जगवण्यासाठी कुंभारवाड्यातील समाजाची धडपड सुरू आहे. कुंभारवाड्यातील इतिहासात इतक्‍या वर्षात पहिल्यांदाच भट्टीसाठीच्या चिमणीचा प्रयोग होत आहे. त्यानिमित्तचा ग्राऊंड रिपोर्ट...

कुंभारवाड्याचे मूळचे ठिकाण म्हणजे माटुंगा. शहराच्या वेशीवरचे ठिकाण म्हणून त्याची ओळख होती. आता धारावीच्या कुंभारवाड्यात सुमारे पाच हजार कुटुंबे राहतात. कुंभारवाड्यात आज तिसरी पिढी माठ बनवण्याच्या व्यवसायात आहे. गुजरातमधील प्रजापती समाज आणि गुजरातचाच कच्छी मुस्लिम समाज अनेक वर्षे या व्यवसायात आहे. माती वाहून आणण्याचा खर्च, इंधन आणि मजुरांसाठी खिशाला पडणारा चाट, मार्केटिंगची आव्हाने, जागेच्या मर्यादा आदींसारख्या अनेक समस्यांच्या गर्तेत हा व्यवसाय आपल्या अस्तित्वाची लढाई लढतोय.

कुंभारवाड्यालाही महागाईची झळ
कुंभारवाड्यात प्रामुख्याने बनवली जातात मातीची नानाविध भांडी. सध्याच्या चकचकीत अन्‌ आकर्षक डिझाईनच्या जमान्यात फिनिशिंगसाठी कच्चा मालही चांगला वापरावा लागतो. माती स्वस्त असली तरीही ती वाहून आणण्याचा खर्च सर्वाधिक आहे. शिवाय मातीपासून तयार झालेले उत्पादन भाजण्यासाठी भट्टीलाही इंधन लागत. भुसा, चिंधी जाळून दिवसातून दोनवेळा भट्टी पेटवावी लागते. त्यासाठीही खर्च न चुकणारा असा आहे. त्यामुळेच हा व्यवसाय एकमेकात गुरफटलेला असा आहे.

धारावीतील चिमणीचे पहिले मॉडेल
कुंभारवाड्यात भट्ट्यांच्या निमित्ताने होणाऱ्या धुराविषयीच्या समस्या आहेत, अशी माहिती मिळाली होती. धारावी शेल्टर संस्थेच्या निमित्ताने कुंभारवाड्यात होणाऱ्या भट्टीच्या समस्येची माहिती आम्हाला देण्यात आली. न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीत शिकणाऱ्या अबुधाबीच्या इंजिनिअरिंगच्या काही विद्यार्थ्यांनी मुंबई दौऱ्यात धारावीतला कुंभारवाडा पाहिला होता. कपडा, चामडे अन्‌ लाकूड जाळून कुंभारकामाची भट्टी चालवली जात असल्याने रहिवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे सगळे घातक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावर मार्ग काढण्याचा मुद्दा निघाला तेव्हा कुंभारवाड्यात भट्टीसाठी काम करण्याचा विचार सुरू झाला. या विद्यार्थ्यांनी आठवडाभर काम करून कारागीर-रहिवाशांशी बोलून सगळ्या विषयांबाबत विचारपूस केली. त्या दृष्टीने भट्टीचे डिझाईन, सोर्स, आकारमान आदी काही गोष्टी कागदावर उतरल्या अन्‌ तीन ते चार दिवसांत भट्टी उभारली गेली.
- समीधा पाटील (प्रतिनिधी, अर्ब्झ फाऊंडेशन)

चिमणीने फरक पडेल
भट्टीवर चिमणीचे काम सुरू झाल्यानंतर नक्कीच कामाच्या ठिकाणी फरक पडू शकेल, असा विश्‍वास मला वाटतो. भट्टीतून निर्माण होणारा काळा धूर वर जाण्यासाठी चिमणीची मदत होईल. फ्लॉवरपॉट, माठ अशा काही गोष्टी भट्टीत तयार होतात. माझी भट्टी ७० वर्षे जुनी आहे. आमची दुसरी पिढी या व्यवसायात काम करतेय. मी ६३ वर्षांचा आहे. तरीही काम करतोय. ४० वर्षांपासून काम करतोय. वडिलांनी सुरू केलेल्या व्यवसायात चार भावांपैकी आम्ही दोघे मिळून या व्यवसायात आहोत. नव्या पिढीत फक्त भावाचा मुलगा हा व्यवसाय करतो. इतर मुले दुसरे काम करतात.
- रणछोडदास लाड (भट्टीचा मालक)

धूर रोखणारी भट्टी
कुंभारवाड्यात स्वच्छतेच्या दृष्टीने सुरुवातीला काम करायला आम्ही आलो होतो. भट्टीच्या निमित्ताने या विद्यार्थ्यांची मदत घेऊन चिमणी तयार करण्याचे ठरवले. चिमणी उभारण्याचा खर्च कमी व्हावा म्हणून वेल्डिंगपासून कामगाराच्या भूमिकेतही आम्ही साऱ्यांनी योगदान दिले. त्यामुळेच अवघ्या ५० हजारांत भट्टी उभारणे शक्‍य झाले. त्यानिमित्ताने धारावीच्या कुंभारवाड्यात काम करणाऱ्यांच्या आरोग्याकडे पाहण्याची सुरुवात झाली आहे. कुंभारवाड्याच्या नजीकच्या परिसरात सायन, हिंदुजा, लीलावती, भाभा आदी हॉस्पिटल्स आहेत. या धुराचा दोन ते तीन किलोमीटर परिसरात परिणाम जाणवतो. त्यामुळेच हे मॉडेल उभारले आहे. बंद भट्टी नसावी, अशी रहिवाशांची मागणी होती. नवरात्रीत गरब्यासाठी जागा असावी म्हणूनच खुल्या भट्टीची मागणी करण्यात आली आहे. लोकसहभागातूनच कमी पैशात ही भट्टी उभारण्यात आली. धुरामुळे दम्याचा त्रास अनेकांना होतो; पण अजूनही स्थानिकांना याचे गांभीर्य लक्षात आलेले नाही.
- पॉल राफेलो (धारावी शेल्टर)

तिसरी पिढी व्यवसायात
गुजरातमधील प्रजापती समाज मुख्यत्वेकरून कुंभार व्यवसायात काम करतो. तब्बल दीडशे वर्षे त्यांचे हे काम सुरू आहे. आता त्यांची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. कुंभारकाम करणारी एकूण पाच हजार घरे धारावी-कुंभारवाड्यात आहेत. कच्छी मुस्लिम समाजाची २५ घरे हे काम करतात. सध्या मात्र पाच हजार घरांपैकी प्रत्यक्षात तीनशे कारागीर हे काम करत आहेत. पणती, माठ अन्‌ झाडाची कुंडी धारावीत बनते. प्रजापती कुंभार समाजाची ‘प्रजापती सहकारी उत्पादक मंडळ लिमिटेड’ ही १९५१ पासूनची नोंदणीकृत संस्था आहे. धारावीत आजघडीला ७० ते ८० भट्ट्या आहेत. राहत्या ठिकाणीच दोन चाळींमधील अंतरामध्ये ही मातीच्या वस्तू भाजण्याची भट्टी लागते. धुराचा त्रास होतो; पण पोटासाठी सगळे सहन करायचे अशाच मानसिकतेत अनेक वर्षे पिढीनंतर पिढी या ठिकाणी राहत आहे.

Web Title: Dharavi Kumbharwada