धारावीतील पादचारी पुलाची वर्गणी काढून दुरुस्ती 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

धारावी - धारावीहून सायनच्या दिशेने जैन सोसायटीकडे जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या मध्य रेल्वेच्या पादचारी पुलाची पार दुरवस्था झाली होती. पुलाच्या पायऱ्या फुटल्या होत्या. दुरुस्तीकडे पालिका आणि रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याने रहिवासी संताप व्यक्त करीत होते. अखेर त्यांनीच पुढाकार घेत चक्क वर्गणी काढून पुलाची दुरुस्ती केली. 

घाटहून सायन येथील जैन सोसायटीजवळ पादचारी पूल उतरतो. सायनची गुरुनानक शाळा, डी. एस. हायस्कूल, पालिकेची सेकंडरी शाळा आणि एस. आय. डब्ल्यू. महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी या पुलाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळे पुलावर नेहमी वर्दळ असते. सायन रुग्णालयात जाणारे रुग्णही याच पुलाचा वापर करतात. काही महिन्यांपासून पुलाची दुरवस्था झाली होती. पुलाच्या दुरुस्तीसाठी खासदार, आमदार, नगरसेवक, पालिका आणि रेल्वेकडे स्थानिक समाजसेवकांनी पाठपुरावा केला पण उपयोग झाला नाही. अनेकदा पादचारी पुलावरून घसरून जखमी होत होते. अखेर रहिवाशांनी वर्गणी काढून पुलाच्या दुरुस्तीला सुरुवात केली. जैन सोसायटीकडे उतरणाऱ्या पुलाच्या पायऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे, पण धारावीच्या दिशेकडील पायऱ्या तशाच होत्या. त्याबद्दल पादचारी आश्‍चर्य व्यक्त करीत होते. अखेर आता नागरिकांनी त्यांची दुरुस्ती सुरू केली आहे. 

पुलाच्या डागडुजीची मागणी 
पुलाला जागोजागी तडे गेले आहेत. खड्डे पडले आहेत. पूल जर्जर झाला आहे. मध्य रेल्वेच्या गाड्या धडधडत जातात त्या वेळी अख्खा पूल हादरतो. त्यामुळे पूल कधीही कोसळून गंभीर अपघात होण्याची भीती पादचारी व्यक्त करीत आहेत. पुलाची डागडुजी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Dharavi pedestrian bridge