ढोलकी विक्रेत्यांना महागाईची झळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

रोहा : गणेशोत्सवात ‘गणा धाव रे गणा पाव रे....’ अशी अस्सल कोकणी गीते ढोलकीच्या ठेक्‍यावर घुमू लागतात आणि आबालवृद्धांची पावले थिरकू लागतात; मात्र गेल्या पाच-सहा वर्षांपासून ढोलकीच्या विक्रीत सातत्याने घट होत असून, त्यांच्या किमतीही वाढत असल्याचे विक्रेते सांगत आहेत.

रोहा : गणेशोत्सवात ‘गणा धाव रे गणा पाव रे....’ अशी अस्सल कोकणी गीते ढोलकीच्या ठेक्‍यावर घुमू लागतात आणि आबालवृद्धांची पावले थिरकू लागतात; मात्र गेल्या पाच-सहा वर्षांपासून ढोलकीच्या विक्रीत सातत्याने घट होत असून, त्यांच्या किमतीही वाढत असल्याचे विक्रेते सांगत आहेत.

रोहा, कोलाड, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धनसह जिल्ह्यातील सर्वच भागांत परप्रांतातून आलेले ढोलकी विक्रेते फिरू लागले आहेत; मात्र पूर्वीसारखा खप होत नसल्याची खंत ढोलकी विक्रेते व्यक्त करीत आहेत. पूर्वी एक विक्रेता रक्षाबंधन ते गणेश चतुर्थी या २० दिवसांच्या काळात २५० ते ३०० ढोलक्‍या विकायचा. आता ही विक्री निम्म्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे ढोलकी बनवणारे कारागीरही इतर व्यवसायात स्थिरावू लागले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत ढोलक्‍यांच्या किमती ३० ते ५० टक्के वाढल्या आहेत.

मागील वर्षी १०० रुपयांना मिळणारी ढोलकी या वर्षी १५० रुपयांना विकली जात आहे. प्रवासखर्च, मजुरीचे वाढलेले दर व जीएसटीमुळे कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ या सगळ्यामुळे ढोलकीच्या किमती वाढल्याचे विक्रेते सांगतात. आंबा, देवदार अथवा सागाच्या लाकडापासून ढोलकीचा खोल किंवा साचा बनवला जातो. बांबूच्या चिपांपासून गाडा बनवून त्यावर बकऱ्यांचे कमावलेले कातडे चढवले जाते. हे गाडे मजबूत दोरीच्या साह्याने खोलवर चढवले जाते. अशा पद्धतीने ढोलकी तयार होते. या दोरीला ताण देऊन चामड्याचा ताण कमी-जास्त करून ढोलकी हव्या त्या तालावर आणता येते.

ढोलकीच्या किमती १५० रुपयांपासून ३ हजार रुपयांपर्यंत आहेत. सामान्य ग्राहक १५० ते ५०० रुपयांपर्यंत किमतीची ढोलकी खरेदी करतात. जास्त विक्री याच ढोलक्‍यांची होते. ढोलकी विक्रेते लखनौ भागातून कोकणात येतात. ते गटाने वेगवेगळ्या भागात राहून विक्री करतात.

माझ्या घरी पाच दिवसांचा गणपती असतो. मुलांना आपली संस्कृती कळावी. संगीताची ओळख व्हावी म्हणून ढोलकी खरेदी केली आहे.
- अजित गुप्ता, ग्राहक कोलाड

पूर्वीसारख्या ढोलक्‍या विकल्या जात नाहीत; मात्र पारंपरिक व्यवसाय सोडावासाही वाटत नाही. विक्री निम्म्याने घटली आहे. वाहतूक खर्च, मजुरी, कच्च्या मालावर लागणारी जीएसटी यामुळे किमती ३० ते ५० टक्के वाढल्या आहेत.
- महंमद साबीर शेख, ढोलकी विक्रेता
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dholaki sellers face inflation