धुळ्यातील डॉक्‍टरला मारहाणीचा निषेध 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

मुंबई -  धुळे येथील डॉक्‍टरला झालेल्या मारहाणीनंतर डॉक्‍टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या हल्ल्याविरोधात निवासी डॉक्‍टरांना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. "मार्ड' या निवासी डॉक्‍टरांच्या संघटनेचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. 

मारहाण झालेल्या डॉक्‍टरला एक डोळा गमवावा लागण्याची शक्‍यता आहे, तरीही डॉक्‍टरांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात सरकार कोणतीही पावले उचलत नसल्याची खंत इंडियन मेडिकल असोसिएशनचे खजिनदार डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी व्यक्त केली. सेंट्रल मार्डचे माजी अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी डॉक्‍टरांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत जबाबदारीने हाताळला पाहिजे, असे मत मांडले. वैद्यकीय महाविद्यालयांत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयांप्रमाणे सरकारी रुग्णालयांतही रुग्णाबरोबर एक किंवा दोन नातेवाइकांनाच प्रवेश दिला पाहिजे, असे ते म्हणाले. 

हल्ल्याच्या भीतीमुळे आपत्कालीन रुग्ण विभाग किंवा तातडीच्या विभागात डॉक्‍टर ऍप्रन न घालताच वावरतात, असे नायर रुग्णालयातील निवासी डॉ. सागर डोळे यांनी सांगितले. डॉक्‍टरांच्या मनातील भीती घालवण्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत, अशी अपेक्षा या वेळी डॉक्‍टरांनी व्यक्त केली. असोसिएशनचे माजी पदाधिकारी डॉ. सुहास पिंगळे, रेडिओलॉजिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी आणि राज्यातील विविध भागांतून आलेले डॉक्‍टर या आंदोलनात सहभागी झाले होते. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतील डॉक्‍टरांनी आज काळ्या फिती लावून काम केले. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांनी कामावर बहिष्कार टाकला नाही. 

Web Title: Dhule doctor beat them up protest