गृहविलगीकरणामुळे संसर्ग वाढला? मुख्यमंत्र्यांची BMC अधिकाऱ्यांसोबत बैठक; पोस्ट कोव्हिड उपचारांवर चर्चा

समीर सुर्वे
Sunday, 6 September 2020

पोस्ट कोव्हिड उपचारांसाठी नियमवाली तयार केली जाण्याची शक्यता असून जम्बो कोव्हिड केंद्रांची जबाबदारी नामांकित डॉक्टरांवर देण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबईतील गृहविलगीकरणात असलेल्याा रुग्णांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे का? याबाबत आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्याच बरोबर पोस्ट कोव्हिड उपचारांसाठी नियमवाली तयार केली जाण्याची शक्यता असून जम्बो कोव्हिड केंद्रांची जबाबदारी नामांकित डॉक्टरांवर देण्यात येणार आहे.

अरे बापरे! गणपती आरतीसाठी एकत्र आलेल्या एकाच कुटुंबातील 30 जणांना कोरोनाची लागण

मुंबईत पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत असली तरी मृत्यूदर कमी झाला आहे.सप्टेबर महिन्यात मृत्यूदर 2.6 टक्क्यांवर आला.पालिका रुग्णांलयातील मृत्यूदर कमी झाला आहे. सुरूवातील एकूण मृतांपैकी 82 टक्के होता तो आता 59 टक्के इतका कमी झाला, तर खासगी रुग्णालयांत पूर्वी कमी असलेला 18 टक्के मृत्यू दर वाढून 39 टक्के झाल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली. मुंबईतील 11 प्रभागांमध्ये कोव्हिडच्या रुग्णांचे प्रमाण 7 ते 8 टक्के आहे. मात्र, 13 प्रभागांमध्ये हे प्रमाण जास्त आहे.

प्रत्येक प्रभागाच्या सहाय्यक आयुक्ताने त्यांच्या वॉररुमद्वारे नागरिकांमध्ये यासंदर्भात जनजागृती करावी आणि बाधितांना जम्बो केंद्रामध्ये दाखल करण्यावर भर दयावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुंबईत अतिशय उत्कृष्ट जम्बो सुविधा असून रुग्णांनी खासगी रुग्णालयांचा आग्रह न धरता याठिकाणी दाखल व्हावे, त्यांना निश्चितपणे चांगले उपचार मिळतील. प्रत्येक जम्बो सुविधा नामांकित व मोठ्या रुग्णालयांच्या डॉक्टर्सना विभागून देखरेखीसाठी देण्याचा सुरु आहे. कोव्हिड केंद्रात सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पोस्ट कोव्हिड उपचारांवर भर द्या!
कोरोना मुक्त झालेल्या काही रुग्णांमध्ये दुष्परिणाम दिसत आहेत; मात्र हे दुष्परिणाम कोव्हिडचे आहेत की जे औषधोपचार केले आहेत, त्याचे आहेत हेही पाहिले पाहिजे. त्यासाठी पोस्ट कोव्हिड उपचार महत्वाचे आहे. त्यासाठी चांगली व्यवस्था उभारा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले 

कामातील चुका शोधा 
कोव्हिडवर नेमके औषध नसले तरी उत्कृष्ट रुग्णसेवा आवश्यक आहे. त्यामुळे मृत्यूदर कमी होऊ शकतो
केवळ बेडस, औषधे दिले म्हणजे आपण सुटलो असे नाही. रुग्ण सेवा चांगली पाहिजे. शिथिलता दूर करा. कामातील चूक शोधा आणि पाऊले टाका असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अखेर ज्याची भीती होती तेच झालं! गणेशोत्सवानंतर मुंबईत कोरोनाबाधीतांची संख्या वाढली; रुग्णांचे खासगी रुग्णालयालाच प्राधान्य

इतर आजार नसलेले ज्येष्ठ गृह विलगीकरणात
50 वर्षावरील रुग्णांना कोव्हिड केंद्रातच उपचार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. याबाबतही बैठकीत चर्चा झाली. 50 पेक्षा जास्त वय असलेल्या आणि लक्षणे नसणाऱ्या व इतर कुठलेही आजार नसणाऱ्या व्यक्तींना गृह विलगीकरणात ठेवावे याबाबतही चर्चा झाली असल्याचे समजते.

घटता मृत्यूदर 
जून 5.58%, 
जुलै 4.88%, 
ऑगस्ट 4.07%, 
सप्टेंबर 2.6%

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Did home segregation increase infection? CMs meeting with BMC officials; Discussion on post covid treatment