घातक रसायनांमुळे सागरी प्रदूषणात वाढ! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

समुद्रातील वाढत्या प्रदूषणात वेगवेगळ्या रसायनांचा मारा आता धोक्‍याची पातळी गाठू लागला आहे. देशाजवळील समुद्रात सहज धुतली जाणारी जहाजे समुद्रातील पर्यावरणाचा ऱ्हास करत आहेत, अशी टीका मच्छीमारांकडून केली जात आहे.

मुंबई - समुद्रातील वाढत्या प्रदूषणात वेगवेगळ्या रसायनांचा मारा आता धोक्‍याची पातळी गाठू लागला आहे. देशाजवळील समुद्रात सहज धुतली जाणारी जहाजे समुद्रातील पर्यावरणाचा ऱ्हास करत आहेत, अशी टीका मच्छीमारांकडून केली जात आहे. हे प्रकार मात्र बिनदिक्कत सुरूच आहेत. परिणामी, सागरी प्रदूषण वाढत असल्याचे पर्सेसिंग फिशिंग असोसिएशनचे गणेश नाखवा यांनी सांगितले. 

सांडपाण्याचा निचरा न होता किनारपट्टीजवळ सोडल्या जाणाऱ्या रसायनांमुळे किनाऱ्याजवळची मासळी जवळपास संपुष्टात आली आहे. कोळंबी, पापलेट आदींचे अस्तित्व पूर्णपणे धोक्‍यात आले आहे. त्यांना रसायनमिश्रित पाण्यात जगणे अवघड होऊन बसले आहे. आधीच बेकायदा मासेमारीमुळे मासळी धोक्‍यात आलेली असताना मुंबईतील किनाऱ्यालगतच्या तब्बल पाच किलोमीटर परिसरात मासे दिसेनासे झाले आहेत, अशी खंतही गणेश नाखवा यांनी व्यक्त केली. अशातच मुंबईतील किनाऱ्याजवळ जहाजे बुडण्याच्या दुर्घटना घडल्याने होणाऱ्या तेलगळतीमुळे समस्या आणखी जटिल झाल्याचेही नाखवा म्हणाले. 

2011 मध्ये "रॉकी एस' नावाचे जहाज मुंबईतील किनाऱ्याजवळ बुडाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तेलगळती झाल्याने सागरी जीवांचेही अतोनात नुकसान झाले. हा प्रकार आजही पूर्व आणि पश्‍चिम किनारपट्टीवर सुरू असून यावर संबंधित सरकारी यंत्रणांचे काडीमात्र नियंत्रण नसल्याचा आरोपही नाखवा यांनी केला. या संदर्भात राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था आणि केंद्रीय समुद्री मत्स्य संशोधन संस्थेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. 

2015 पासून मुंबईतील किनाऱ्यावर मृत डॉल्फिन आणि मृत कासवे सातत्याने दिसून येत आहेत. खोल समुद्रात होणारे उत्खनन हे त्यासाठी कारणीभूत आहे. देशालगतच्या समुद्रात खोलवर स्फोटके घडवून आणली जात आहेत. या प्रकारांकडेही सरकारी यंत्रणांनी कानाडोळा केला आहे. 
- गणेश नाखवा,  पर्सेसिंग फिशिंग असोसिएशन 

Web Title: Different chemicals in the growing pollution of the sea