ठाण्यात व्हीव्हीपॅट मोहिमेला खीळ

दीपक शेलार
रविवार, 6 जानेवारी 2019

ठाणे : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मतदारांना मतदान यंत्रणांची माहिती देण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत राबवण्यात येणाऱ्या मोहिमेला ठाण्यात राजकीय पक्षांच्या अनास्थेमुळे खीळ बसल्याचे चित्र आहे. या मोहिमेसाठी मतदार याद्या अद्ययावत आणि अचूक बनवण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांसह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी ब्लॉक स्तरावर नेमण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते; मात्र 6 हजार 890 मतदान केंद्रांसाठी अवघे 1059 राजकीय प्रतिनिधींची नावे राजकीय पक्षांकडून देण्यात आली आहेत. यामुळे जनजागृती मोहिमेबाबत राजकीय पक्षांमध्ये अनास्था दिसून येते. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीनबाबत काही जणांकडून शंका व्यक्‍त करण्यात येत होत्या. यावर काही राजकीय पक्षांनी ईव्हीएम मशीनऐवजी मतदानपत्रिकेचा वापर करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यावर उपाय म्हणून निवडणूक आयोगाने याबाबत मतदारांमध्ये जागृती करण्याचे काम सुरू केले आहे. त्यानुसार ईव्हीएम (इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशीन) आणि व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल) यंत्रे नक्की कशी काम करतात, याबाबत ठाणे जिल्ह्यात 27 डिसेंबरपासून जनजागृती मोहीम सुरू केली आहे. 65 दिवस ही मोहीम सुरू राहणार असून, यासाठी मतदार याद्या अद्ययावत आणि अचूक असणे गरजेचे असल्याने जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक विभागाने ब्लॉक स्तरावर प्रतिनिधी नेमण्यासाठी राजकीय पक्षांना आवाहन केले होते.

त्यानुसार 1 हजार 59 प्रतिनिधींची नावे प्रशासनाकडे प्राप्त झाली; मात्र मतदान केंद्रे 6 हजार 890 असल्याने मोठ्या संख्येने राजकीय प्रतिनिधींची आवश्‍यकता असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली. राजकीय पक्षांच्या या अनास्थेमुळे पारदर्शक मतदान प्रक्रियेसाठी राबवण्यात आलेल्या व्हीव्हीपॅट प्रणालीच्या जनजागृतीला खीळ बसली आहे. 

मतदान केंद्रांमध्ये नेमण्यात आलेल्या राजकीय प्रतिनिधींची आकडेवारी 

पक्ष प्रतिनिधी 
शिवसेना 491 
भाजप 375 
कॉंग्रेस 65 
राष्ट्रवादी कॉंग्रेस 40 
बसप 21 
मनसे 57 
रिपाइं 8 
इतर 2 

जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी दोनप्रमाणे 18 विधानसभा मतदारसंघांत 36 आणि एक जिल्हाधिकारी कार्यालयात अशी 37 व्हीव्हीपॅट वाहने जनजागृती करीत आहेत. यासाठी राजकीय पक्षांनीदेखील प्रत्येक ब्लॉकमध्ये त्यांचे प्रतिनिधी नेमल्यास दोघांच्या समन्वयाने मतदार यादी अचूक बनविण्याचे काम सहज करता येऊ शकते. सध्या 6 हजार 488 मतदान केंद्रे आहेत; परंतु नवमतदार वाढल्याने 400 केंद्रे वाढणार आहेत. 

- अर्चना सोमाणी-आरोलकर, उपजिल्हानिवडणूक अधिकारी 

Web Title: Difficulties of VVPAT campaign in Thane