दिघी पोर्टचा ट्रेलर थेट दुकानांत

म्हसळा : शहरात मुख्‍य बाजारपेठेत भरधाव आलेला दिघी पोर्टचा ट्रेलर थेट दुकानांत घुसला.
म्हसळा : शहरात मुख्‍य बाजारपेठेत भरधाव आलेला दिघी पोर्टचा ट्रेलर थेट दुकानांत घुसला.

म्हसळा (वार्ताहर) : दिघी पोर्टमधून होणाऱ्या अवजड वाहतुकींनी दिघी ते माणगाव आपली दहशत निर्माण केल्याच्या तक्रारी वाढतच आहेत. हीच दहशत मंगळवारी (ता. १७) पहाटे ४.४५ च्या सुमारास म्हसळा नवानगरच्या बाजारपेठेत दिसून आली. या बाजारपेठेतून अवजड क्‍वाईलची वाहतूक करणारा ट्रेलर थेट तीन दुकानांत घुसला. यात तीन दुकानांमधील सुमारे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने जीवितहानी झाली नाही.

नवेनगर येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते नवीद हुसेनमीया जंजीरकर (वय ३७) यांनी दिलेल्या तक्रारीवरून म्हसळा पोलिसांनी  अपघाताची नोंद केली आहे. अपघातग्रस्त ट्रेलर दिघी-म्हसळा मार्गाने माणगाव (एमआयडीसी भागाड) पास्को येथे जात होता. ट्रेलरचालक बेदरकारपणे वाहन चालवत असताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. म्हसळा बाजारपेठ येताच नवानगर परिसरातील खतीब-लांबे कॉम्प्लेक्‍समधील मे. पाटील ट्रेडर्स, सिराजभाई मुसा व लांबे यांच्या दुकानात ट्रेलर शिरला. मे. पाटील ट्रेडर्सचे मालक चंद्रकांत पाटील यांच्या दुकानांमधील पायऱ्या, शेड, शटर असे सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले आहे. तसेच, अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे अंमलदार संतोष चव्हाण यांनी सांगितले. 

म्हसळा तालुक्‍याच्या मुख्य बाजारपेठेतूनच भरधाव वेगाने अशा प्रकारे अवजड वाहने जात असतात. या वाहनांवर सरकारचे कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसल्याने आज बेफाम, बेफिकीरपणाने ते प्रवास करत आहेत. मात्र, या घटनेमुळे आज नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

दिघी पोर्टची वाहतूक ही गेली १० वर्षे म्हसळा शहरातून अनधिकृतपणे होत आहे. आंतरराष्ट्रीय दिघी बंदर व्यवस्थापनाने वाहतुकीची योग्य उपलब्धता नसताना बंदर कार्यान्वित करायची आवश्‍यकता नव्हती. शहरातून होणारी दिघी पोर्टची वाहतूक तत्काळ बंद करावी. माणगाव ते दिघी या ५५ किलोमीटर अंतरात अशा पद्धतीचे किमान १६३ अपघात झालेले आहेत. एमएमआरडीएने या अपघातांचा अभ्यास करावा आणि रस्त्यांच्या रचनेत सुधारणा करावी.
- महादेव पाटील, म्हसळा तालुकाप्रमुख, शिवसेना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com