नगरसेवकांमध्ये थेट रस्त्यावर हमरीतुमरी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 August 2019

ठाण्यातील शिवसेनेत दुहीची बीजे

ठाणे : विधानसभा निवडणूक जवळ आलेली असतानाच शिवसेनेच्या नगरसेवकांमधील दुही रस्त्यावरही व्यक्त होऊ लागल्याने ती ठाण्यातील वरिष्ठ नेत्यांची चिंता वाढवणारी ठरली आहे.

हाजुरी येथील पॅनलमधील शिवसेनेच्या चारही नगरसेवकांचे एकमत नसल्याचे जगजाहीर आहे. पण हा वाद विकोपाला जाऊन रविवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानंतर या नगरसेवकांमध्ये थेट हमरीतुमरी झाल्याने खळबळ उडाली.

पालकमंत्री शिंदे पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी हाजुरी परिसरात आलेले होते. त्यावेळी पक्षाच्या नगरसेवकांसह आमदार रवींद्र फाटक, स्थायी समितीचे सभापती राम रेपाळे आणि शिवसैनिक उपस्थित होते. पण पालकमंत्री घटनास्थळावरून निघून गेल्यानंतर राम रेपाळे आणि विकास रेपाळे यांच्यात काही विषयांवरून शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामध्ये रवींद्र फाटक यांनी हस्तक्षेप केल्यानंतर विकास रेपाळे आणि त्यांच्यात वाद झाला.

हा वाद एवढा वाढला की, फाटक समर्थक नगरसेविका आणि विकास रेपाळे यांच्यात थेट हमरीतुमरी झाली. भर रस्त्यावर शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये झालेल्या या हमरीतुमरीचे पडसाद पक्षासह महापालिकेतही उमटले. पण या वादात सहभागी असलेल्या साऱ्यांनीच या विषयावर थेट प्रतक्रिया देण्याचे टाळले.

पक्षाचा वादग्रस्त प्रभाग म्हणून नोंद
आजच्या घडीला शिवसेनेसाठी सर्वात वादग्रस्त प्रभाग म्हणून या प्रभागाची नोंद झाली आहे. यापूर्वी हाजुरी येथील काही रस्ते आणि शाळेच्या विषयावरून शिवसेनेच्याच नगरसेवकांमध्ये शह-काटशहाचे राजकारण रंगल्याची चर्चा होती. त्याचे पडसाद काही प्रमाणात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही उमटले होते. पण त्यानंतर वरिष्ठ नेत्यांनी तंबी दिल्यानंतर हा वाद शमल्याचे मानले जात होते. पण रविवारी या वादाला पुन्हा फोडणी मिळाली आहे.

काही विषयावरून आमच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आहे. हमरीतुमरी झालेली नाही. हा विषय एवढा मोठा नाही. घडलेली घटना आम्ही वरिष्ठ नेत्यांना कळवली आहे. त्यांचा या विषयावरील निर्णय अंतिम निर्णय आहे. त्यावर मला अधिक बोलायचे नाही.
- विकास रेपाळे,
नगरसेवक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Direct street disputes between corporaters in Thane