पेणमध्‍ये रुग्‍णांची गैरसोय

पोलिस उपअधीक्षक नितीन जाधव यांना निवेदन डॉक्‍टर.
पोलिस उपअधीक्षक नितीन जाधव यांना निवेदन डॉक्‍टर.

मुंबई : पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात सेवेत असणाऱ्या डॉक्‍टर, नर्स यांना काही अज्ञात व्यक्‍तींनी गोंधळ घालून धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याचा प्रकार बुधवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या डॉक्‍टर व नर्स यांनी गुरुवारी सकाळी काम बंद आंदोलन केले. पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर दुपारनंतर हे काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले.

बुधवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास काही जण किरकोळ जखमी झालेल्या एका रुग्णाला उपचारासाठी घेऊन आले होते. यातील काही व्यक्तींनी ड्युटीवर असलेल्या डॉक्‍टरांना धक्काबुक्की, तर नर्सना शिवीगाळ करत गोंधळ घातला होता. हे सर्वजण दारूच्या नशेत होते आणि त्यांनी येथे येऊन डॉक्‍टरांशी अर्वाच्य शब्दांत बोलण्यास सुरुवात केली. डॉक्‍टरांनी त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिल्यानंतरही आलेल्या व्यक्तींनी नर्स आणि वार्डबॉय यांनाही शिवीगाळ आणि अश्‍लील शब्दांत बोलण्यास सुरुवात केली. पोलिसांना पाचारण करण्यात आल्यानंतर स्थिती नियंत्रणात आली.

रुग्णालयातील डॉक्‍टरांनी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळपासून रुग्णालय बंद ठेवले होते. जोपर्यंत आरोपींना कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत रुग्णालयाची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयातील डॉक्‍टरांच्या संघटनेने उपविभागीय पोलिस अधीक्षक नितीन जाधव आणि तहसीलदार अरुणा जाधव यांच्याकडे निवेदन दिले. पोलिस उपअधीक्षक नितीन जाधव यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रुग्णालयाची सेवा दुपारनंतर सुरू करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी रुग्णालयात गोंधळ करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेतले असून, इतरांचा शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com