Mumbai : पावसाळ्यापूर्वीच नाले सफाईवरून रेल्वे-पालिकेत जुंपली? रेल्वे विभागाने व्यक्त केली नाराजी ! | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

drains

Mumbai : पावसाळ्यापूर्वीच नाले सफाईवरून रेल्वे-पालिकेत जुंपली? रेल्वे विभागाने व्यक्त केली नाराजी !

मुंबई : मुसळधार पाऊस पडल्यानंतर मुंबईमधील सखल भागांमध्ये साचणाऱ्या पाण्याचा झटपट निचरा व्हावा यासाठी दरवर्षी पालिका आणि रेल्वेकडून नालेसफाई केली जाते. मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत होऊ नये म्हणून यंदा पश्चिम रेल्वेने कंबर कसली आहे.

नुकताच पालिका आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत रेल्वेने पालिकाकडून नालेसफाई योग्य पद्धतीने झाले नसल्याचा ठपका ठेवला आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यात पुन्हा एकदा नाले सफाईवरून पश्चिम रेल्वे- पालिकेत जुंपणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मुंबई उपनगरात दरवर्षी विक्रमी पाऊस कोसळतो, तसेच पावसातच समुद्राला आलेल्या भरतीमुळे काहीच कालावधी मुंबईच्या सखल भागात पाणी साचते आणि मुंबईची तुंबई होते. याच्या परिणाम रेल्वे वाहतुकीवर पडतो. त्यामुळे मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत होऊ नये म्हणून दरवर्षी महापालिका आणि रेल्वे प्रशासनाद्वारे युद्धपातळीवर मान्सूनपूर्व कामे केली जातात.

उपनगरीय रेल्वे मार्गांवर रेल्वेच्या हद्दीत नालेसफाई, मोऱ्यांची (कल्व्हर्ट) सफाई करण्यात येते. सद्यस्थितीत मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर विविध मान्सूनपूर्व कामे सुरू आहेत. या कामाचा आढावा घेण्यासाठी सतत पालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीचे सत्र सुरु झाले आहेत. नुकताच नालेसफाई संदर्भात पश्चिम रेल्वेची आणि बृहमुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे.

या बैठकीत पालिकांकडून रेल्वे स्थानक आणि रेल्वे रुळाचा बाजूच्या असेलल्या नाल्याची योग्य पद्धतीने सफाई झाली नसल्याचा ठप्पका पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पालिकेवर ठेवला आहे. यावर पालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांची मोठी चर्चा सुद्धा झाली असल्याची माहिती रेल्वेचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळला दिली आहे.

योग्य पद्धतीने नालेसाफ करा

या बैठकीत रेल्वेने पालिका प्रशासनाला आणखी एकदा नालेसफाई योद्धपद्धतीने झाले आहे की नाही ? संदर्भात आढावा घेण्याची आणि उर्वरित काम कंत्राटदारनाकडून तात्काळ पूर्ण करून घेण्याची विनंती केली आहे. सध्या रेल्वे हद्दीतील व त्यालगतच्या वेगवेगळय़ा नाल्यांमधील गाळ उपसण्यासह मोऱ्यांच्या स्वच्छतेची कामे, विविध ठिकाणी पंप बसविणेचे काम युद्धपातळीयावर सुरु आहे.