नवी मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचे तीनतेरा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

नवी मुंबई शहराच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कामकाज कोलमडले आहे. अद्ययावत संपर्क यंत्रणा, पुरेशा मनुष्यबळाअभावी महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग स्वतःच आपत्तीत सापडले आहे. त्यामुळे शहरावर अचानकपणे मोठी आपत्ती ओढवल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्‍यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे.

नवी मुंबई : जागतिक आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी जागतिक संघाकडून निवड केलेल्या नवी मुंबई शहराच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कामकाज कोलमडले आहे. अद्ययावत संपर्क यंत्रणा, पुरेशा मनुष्यबळाअभावी महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग स्वतःच आपत्तीत सापडले आहे. त्यामुळे शहरावर अचानकपणे मोठी आपत्ती ओढवल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्‍यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या कारकिर्दीत अनेक सनदी अधिकारी होऊन गेले; परंतु कोणीच आपत्ती व्यवस्थापनाच्या बळकटीसाठी प्राधान्य दिले नाही. या विभागाला नेहमीच महापालिकेच्या कारभारात अपेक्षित महत्त्व दिले गेले नाही. परंतु शहराच्या ३० ते ३५ वर्षांच्या इतिहासात कधी नव्हे ते नवी मुंबईची तुंबापुरी व्हायला लागली आहे. नष्ट झालेले पाणथळ व कांदळवने, डेब्रिजने व्यापलेल्या मोकळ्या जागा, गावठाणातील बेसुमार बांधकामे, पावसाळी गटारे व मलनिःसारण वाहिन्यांच्या क्षमतेपेक्षा होत चाललेली इमारतींची बांधकामे कारणीभूत ठरत आहेत. महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन अधिक बळकट करण्यासाठी बृन्हमुंबई महापालिकेच्या  आपत्ती व्यवस्थापन विभागाची तुलना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन प्रमुखांनी तुलना केली असता बृन्हमुंबई महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीपैकी दोन टक्केही सामग्री नवी मुंबई महापालिकेकडे नसल्याचे निष्पन्न झाले आहे. 

एखादी मोठी नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास थेट सरकारी यंत्रणांशी संवाद साधण्यासाठी आवश्‍यक असलेल्या हॉट लाईनची तुलना केल्यास महापालिकेकडे फक्त काही निवडकच हॉटलाईन आहेत. केमिकल्ससंबंधात आपत्ती ओढवल्यास तत्काळ निपटारा करण्यासाठी एमआयडीसी अग्निशमन यंत्रणेची हॉटलाईन महापालिकेकडे उपलब्ध नाहीत. शहरात लावण्यात आलेल्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण आपत्ती व्यवस्थापन कक्षात नाही. सीसी टीव्ही यंत्रणेचे नियंत्रणच नसल्यामुळे सर्वरचा प्रश्नच येत नाही. एखाद्या वेळेस शहराच्या एखाद्या भागात आग लागली तर त्याची माहिती इतरांना देण्यासाठी आवश्‍यक असलेला फायर अलार्म देण्याची व्यवस्था आपत्ती व्यवस्थापन कक्षात नाही. बिनतारी यंत्रणाही बंद अवस्थेत पडलेली आहे. बदलत्या हवामानमुळे उद्‌भवणारी आपत्तीची माहिती प्रसिद्धिमाध्यमांकडून कळण्यासाठी यंत्रणा नाही. महापालिकेचे आपत्कालीन यंत्रणा सध्या एमटीएनएलने दिलेल्या दूरध्वनीच्या भरोसे सुरू आहेत.

अशी आहे पालिकेकडील यंत्रणा
- तीन ते चार लाख लोकसंख्या असलेल्या प्रत्येक प्रभागात बचावासाठी एक बोट व आठ जणांचे पथक
- विभाग कार्यालयात सीसी टीव्हींचे नियंत्रण देण्याचे प्रस्ताव बासनात
- आपत्तींचा निपटारा करण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांची घेतली जाते मदत
-अर्थसंकल्पात आपत्ती व्यवस्थापनासाठी सुमारे एक कोटीची तरतूद.

‘हॅम रेडिओ’ बंद
जेव्हा नैसर्गिक आपत्तीमुळे संदेशवहन यंत्रणा पूर्णपणे कोलमडून जातात, तेव्हा रेडिओवरील तरंगांपासून एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी हॅम रेडिओचा वापर केला जातो. पालिकेकडील हॅम रेडिओ बंद पडलेल्या अवस्थेत आहे. विशेष म्हणजे हॅम रेडिओ चालवण्यासाठी महापालिकेकडे स्वतःचा परवानादेखील नाही. 

पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी काही बदल करण्यात येत आहेत. त्यासाठी शहरात बसवण्यात येत असलेल्या नवीन सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण आपत्ती कक्षात देण्यात येणार आहे.
- रवींद्र पाटील, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disaster Management of Navi Mumbai Municipal Corporation is collapsed