पाणी येण्याच्या वेळीच वीज पुरवठा खंडीत; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

वीज मंडळाने विजेच्या लपंडावाचा खेळ थांबवला नाही तर शिवसैनिक मंडळाच्या प्रत्येक कार्यालया समोर रास्तारोको आंदोलन करणार, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी विद्युत मंडळाला दिला आहे.

उल्हासनगर - ऐन पिण्याचे पाणी येण्याच्या वेळेसच विद्युत पुरवठा तब्बल पाच-पाच तास खंडित होत असल्याने उल्हासनगरकरांचा घसा कोरडा राहू लागला आहे. या सातत्याच्या प्रकाराने कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून वीज मंडळाने विजेच्या लपंडावाचा खेळ थांबवला नाही तर शिवसैनिक मंडळाच्या प्रत्येक कार्यालया समोर रास्तारोको आंदोलन करणार, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी विद्युत मंडळाला दिला आहे.

पावसाळा सुरू असून उल्हासनगरला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात पाण्याचा साठा अमाप आहे. असे असतानाही दिवसातून केवळ एक वेळेस नागरिकांना पिण्याचे पाणी सोडले जाते. पूर्वी दोनदा पाणी सोडले जात होते. मात्र नळांना पाणी येण्याच्या वेळेसच विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी हिसकावून घेतले जात असून पाण्याअभावी घसा कोरडा राहत आहे. हा प्रकार नित्याचा होत असल्याने नागरिकांच्या सहनशीलतेचा बांध फुटण्याची परिस्थिती असून नागरिक रस्त्यावर उतरले तर कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे, असे राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.

याप्रकरणी विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, टाटा कडून येणारा पुरवठा अनपेक्षितपणे खंडित होत आहे. त्यामुळे पुरवठा बंद राहतो असे त्यांचे म्हणणे असून त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. मात्र नित्याचाच हा प्रकार झाला आहे. येत्या तीनचार दिवसात पाण्याच्या वेळेस विद्युत पुरवठा खंडित करण्याचा प्रकार थांबवण्यात आला नाही तर टाटा असो विद्युत मंडळ यांच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरून उल्हासनगरातील सर्व कार्यालया समोर रास्तारोको आंदोलन करणार, ही बाब मध्यवर्ती ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या देखील सांगण्यात आल्याचे राजेंद्र चौधरी यांनी स्पष्ट केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Disconnect the power supply at the time of the arrival of the water at ulhasnagar