मुंबईत आता साथरोगांचा ताप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

मुंबईत पावसाच्या येण्या-जाण्यामुळे आता साथीचे आजार डोके वर काढत आहेत. गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले असून, डेंगी आणि न्यूमोनियाचाही प्रादुर्भाव होत असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

मुंबई - मुंबईत पावसाच्या येण्या-जाण्यामुळे आता साथीचे आजार डोके वर काढत आहेत. गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले असून, डेंगी आणि न्यूमोनियाचाही प्रादुर्भाव होत असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

पावसाने उघडिप दिल्यानंतर आर्द्रता वाढल्यामुळे साचलेल्या पाण्यात डेंगीच्या डासांची पैदास होत आहे. त्यामुळे डेंगीचे रुग्ण आढळू लागले आहेत. दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले आहेत. त्याशिवाय न्यूमोनियाही डोके वर काढत असल्याचे खासगी डॉक्‍टरांनी सांगितले. महापालिका रुग्णालयांतील जूनपासूनच्या यादीत डेंगी आणि न्यूमोनियाच्या रुग्णांच्या नोंदी नाहीत; परंतु आता डेंगीचे रुग्ण वाढत असल्याचे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. 

दहा दिवसांत डेंगीच्या सात आणि मलेरियाच्या तीन रुग्णांवर उपचार करण्यात आले, असे वोक्‍हार्ट रुग्णालयातील औषध विभागाचे सल्लागार डॉ. बेहराम पार्डीवाला यांनी सांगितले. 

न्यूमोनियाचा वाढता धोका
आर्द्रता वाढल्यामुळे रोगजंतूंसाठी पोषक स्थिती निर्माण होते. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी या काळात विशेष काळजी घेणे गरजेचे असते, असे लीलावती रुग्णालयातील छातीविकार विभागातील डॉ. संजीव मेहता यांनी सांगितले. सध्या बाह्यरुग्ण विभागात सर्दी, खोकला, तापाने हैराण झालेले रुग्ण वाढले असून, न्यूमोनियाचेही रुग्ण येत आहेत. या दिवसांत फुप्फुसांचा जंतुसंसर्ग वाढण्याची शक्‍यता असते. त्यामुळे न्यूमोनियाच्या रुग्णांत वाढ होण्याची शक्‍यता असल्याचे डॉ. मेहता म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disease fever in Mumbai