Dismiss the Kalyan-Dombivli municipality
Dismiss the Kalyan-Dombivli municipality

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका बरखास्त करा 

डोंबिवली :सर्वत्र फोवावत चाललेली बेकायदा बांधकामे, 27 गावांचा महापालिकेला असलेला कडाडून विरोध, संपूर्ण प्रशासनाला लागलेली भ्रष्टाचाराची लागण, सर्वाधिक त्रासदायक असे ध्वनी-वायू-पाणी प्रदूषण, सर्वत्र वाढते कचऱ्याचे साम्राज्य, रुग्णालयांनाच तातडीने उपचारांची गरज अशी दयनीय अवस्था आणि निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांवरील खड्ड्यामुळे गेलेले 5 निष्पाप नागरिकांचे जीव यावर काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी तथा केडीएमसीचे माजी नगरसेवक संतोष केणे यांनी दिलेल्या सविस्तर निवेदनाच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चालू अधिवेशनात एका निवेदनाद्वारे कल्याण डोंबिवली महानगरपालिका बरखास्त करण्याची मागणी केली आहे. 

याच पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनीही हीच मागणी उचलून धरत प्रधान सचीवांना याच आशयाचे पत्र दिल्याने केडीएमसीच्या गोटात खळबळ उडाली आहे. 27 गावांना केडीएमसीत समाविष्ट करूनही या गावांचा व महापालिकेचा विकास करण्यात प्रशासन पूर्णतः फोल ठरले आहे. 27 गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीवर या गावांतील मतदार नागरिक ठाम आहेत. पालिकाहद्दीत मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामे होत असून अग्यार समितीने ठपका ठेवलेल्या अतिक्रमणांमध्ये 11 जिल्हाधिकाऱ्यांचे राखीव भूखंड, 10 वनाधिकाऱ्यांचे मुख्यालय, महानगरपालिकेचे कल्याण येथील प्रशासकीय कार्यालय, महापौर आणि पदाधिकारी दालन व 3 इमारती, कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिर, आरक्षित भूखंडावर उभारण्यात आलेली डोंबिवलीच्या मानपाडा रोडवरील येथील कस्तुरी प्लाझाचे निवासी-व्यापारी संकुल, 270 शाळांपैकी 19 अवैध शाळा आणि 416 हॉस्पिटलपैकी  54 अवैध हॉस्पिटल्स आहेत. महानगरपालिकेतील भष्ट्र अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडण्याचे सत्र अव्याहत सुरु आहे.

त्यामुळे पालिकेची प्रतिमा मलीन झाली आहे. पालिका हद्दीत पाणी प्रदूषण आणि वायू प्रदूषण वाढत असल्याने या सर्व बाबी अतिशय गंभीर बनत चालल्या आहेत. कल्याण-डोंबिवलीतील वाढत्या कचऱ्याच्या व घाणीच्या साम्राज्यामुळेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डोंबिवली घाणेरडे शहर असल्याचे संबोधित केले होते. कल्याणचे रुक्मिणीबाई आणि डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयाची भयंकर दुरावस्था झाली आहे. पुरविण्यात येणाऱ्या अपुऱ्या वैद्यकीय सेवा-सुविधा, रुग्णांना लागणाऱ्या औषधांची कमतरता आणि या रुग्णालयात म्हणाव्या तशा सोयी-सुविधा नसल्याने प्रकृती गंभीर असणाऱ्या रुग्णांना ठाणे किंवा मुंबईतील रुग्णालयात नेण्याची वेळ येते. या सर्व गंभीर समस्या लक्षात घेता कुचकामी ठरलेली महानगरपालिका बरखास्त करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी तथा माजी नगरसेवक संतोष केणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे.

या व्यतिरिक्त काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, विधी मंडळ अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे या सर्वांनी ही मागणी उचलून धरत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे .त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे कल्याण-डोंबिवलीकरांसह 27 गावांतील ग्रामस्थ तथा मतदारांच्या नजरा लागल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com