श्रेयवादावरून सेना-भाजपमध्‍ये धुसफूस 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

विविध मेट्रो प्रकल्पांच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आले होते. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वरांचे नाव छापले नाही.

मुंबई - विविध मेट्रो प्रकल्पांच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आले होते. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वरांचे नाव छापले नाही. शिवसेना-भाजप युतीत वरकरणी आलबेल असल्याचे दाखवण्यात येत असले, तरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भूमिपूजनाच्या कार्यक्रमांचे श्रेय घेण्यासाठी भाजपने हा प्रकार केल्याची कुजबुज सुरू होती. 

एमएमआरडीएने प्रसिद्ध केलेल्या निमंत्रण पत्रिकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वगळता एकाही शिवसेना लोकप्रतिनिधीचे नाव नसल्याने शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी नाराजी व्यक्त केली. हा प्रकार नजरचुकीने झाला असून चूक मान्य करत असल्याचे एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांगितले. दरम्यान, एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी आणि मुद्रितशोधकांनी ही निमंत्रण पत्रिका तपासली नव्हती का, असा सवालही उपस्थित केला जात होता. याबाबत एमएमआरडीएच्या आयुक्तांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर खासदार शेवाळे कार्यक्रमाला उपस्थित राहिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dispute between Shivsena and Bjp