कंत्राटदारांचा वाद मंत्रालयात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

नवी मुंबई - महापालिकेच्या शिक्षण विभागातील साहित्य वाटपाच्या कंत्राटांवरून सुरू झालेला वाद आता थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात पोहोचला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पोलिसांनी केलेल्या चौकशीत काही निष्पन्न न झाल्याने पुन्हा चौकशी करण्याचे आदेश एनआरआय ठाण्याला नवी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले आहेत. या आदेशाविरोधात कंत्राटदार जयंतीलाल राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. राजकीय दबावापोटी पोलिस हे कृत्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून निविदा मागवून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यवाटप केले जाते. त्यासाठी निविदेत सहभागी झालेल्या रेडस्टार कंपनीचे मालक जयंतीलाल राठोड यांनी बनावट कागदपत्रे सादर करून कंत्राट मिळवल्याची तक्रार दुसरे कंत्राटदार संतोष काळे यांनी उच्च न्यायालयात केली आहे. मात्र, या सुनावणीला वेळ लागणार असल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हा उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना सर्वोच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यामुळे काळे यांना उच्च न्यायालयात परतावे लागले. याप्रकरणी 13 जूनला उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून दोन आठवड्यांत कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एनआरआय ठाण्याच्या पोलिसांनी राठोड यांची चौकशी करूनही काहीच निष्पन्न झाले नाही; मात्र तरीही नगराळे यांच्यावर असणाऱ्या राजकीय दबावामुळे त्यांनी गुन्हा दाखल करून पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असा आरोप राठोड यांनी केला आहे. दबावापोटी वरिष्ठ अधिकारी नागरिकांना त्रास देत असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी गुजराती समाजाच्या प्रतिनिधींनी आमदार मंदा म्हात्रे यांची भेट घेत राठोड यांना होत असलेल्या त्रासाबद्दल गाऱ्हाणे मांडले. 

जयंतीलाल राठोड यांनी गुजराती समाजाच्या शिष्टमंडळासोबत माझी भेट घेतली. यात काही ठराविक व्यक्ती जाणीवपूर्वक त्यांना त्रास देत असल्याचे त्यांनी मला सांगितले. पोलिसही त्याला साथ देत असून एनआरआय ठाण्याकडून त्रास दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत पडताळणी करून पोलिसांविरोधात तक्रार करणार आहे. 
- मंदा म्हात्रे, आमदार 

मी मूळ याचिकाकर्ता असतानाही पोलिसांनी मला विश्‍वासात न घेता त्रोटक तक्रार नोंद केली. या प्रकरणात 100 कोटींचा घोटाळा असून तो बाहेर काढण्यासाठी मी पुन्हा उच्च न्यायालयात जाणार आहे. माझी लढाई सुरूच राहणार आहे. 
- संतोष काळे, याचिकाकर्ते 

सर्वोच्च व उच्च न्यायालयाकडून फक्त चौकशीचे स्पष्ट आदेश दिले असतानाही पोलिसांनी कोणाच्यातरी दबावाखाली गुन्हा नोंदवला आहे. त्याविरोधात आपण मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली आहे. खंडणीचे गुन्हे दाखल केल्यामुळे मला काहीजण जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. 
- जयंतीलाल राठोड, कंत्राटदार 

Web Title: disputes contractors in mantralaya