ठाण्यात बेवारस वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा

दीपक शेलार
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

सणासुदीला ठाण्यातील रस्ते वाहनांनी ओसंडून वाहत असल्याने शहरात ठिकठिकाणी कोंडी होत असते. आता दिवाळी संपली तरीही सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा अनुभव ठाणेकर घेत आहेत. त्यातच भररस्त्यात महिनोनमहिने उभ्या करून ठेवलेल्या बेवारस वाहनांमुळे रस्ते वाहतुकीला अडथळा ठरत असून त्यामुळे कोंडीत भर पडत आहे.

ठाणे : सणासुदीला ठाण्यातील रस्ते वाहनांनी ओसंडून वाहत असल्याने शहरात ठिकठिकाणी कोंडी होत असते. आता दिवाळी संपली तरीही सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा अनुभव ठाणेकर घेत आहेत. त्यातच भररस्त्यात महिनोनमहिने उभ्या करून ठेवलेल्या बेवारस वाहनांमुळे रस्ते वाहतुकीला अडथळा ठरत असून त्यामुळे कोंडीत भर पडत आहे. ठाणे शहर वाहतूक विभाग आणि ठाणे महापालिका यांच्यामार्फत अशा वाहनांवर नेहमी कारवाई होत असते. मात्र, ही बेवारस वाहने उचलण्यासाठी महापालिकेकडून क्रेन आणि डम्पर उपलब्ध होत नसल्याने या मोहिमेला खीळ बसत असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली. 

मेट्रोच्या कामामुळे आधीच वाहतूक कोंडी होत असताना ठाणे शहरातील विविध रस्त्यांवर अनेक बेवारस वाहने कित्येक दिवसांपासून सर्रास उभी केलेली आहेत. धूळखात पडलेल्या या वाहनांमुळे कोंडीत भर पडत असते. शहरातील सर्वच रस्त्यांवर अशा वाहनांचा उपद्रव वाढल्याने वाहतुकीचे नियंत्रण करण्यात वाहतूक पोलिसांना अडचणी उद्भवतात. विशेष म्हणजे कित्येकदा या भंगार वाहनांमध्ये अनेक दुष्कृत्य होत असल्याच्याही तक्रारीही पोलीसांकडे येतात. या वाहनांच्या अडथळ्याचा फायदा इतर वाहनाच्या अनधिकृत पार्किंगसाठी होत आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यात खितपत पडलेल्या अशा बेवारस वाहनांवर ठाणे शहर वाहतूक शाखा आणि ठाणे महापालिका प्रशासन याच्याद्वारे संयुक्तरित्या कारवाई केली जाते. यासाठी वाहतूक पोलिसांकडून अशा बेवारस वाहनांवर आधी नोटीससदृश्‍य स्टिकर्स चिकटवले जातात. नंतर, 24 तासांमध्ये वाहने तेथून हटवून टाकण्याच्या उद्‌घोषणा केल्या जातात. त्यानंतरही या सूचनेकडे दुर्लक्ष झाल्यास दुसऱ्या दिवशी ही वाहने क्रेनने उचलून डम्परमधून थेट मोकळ्या जागेत फेकली जातात. मात्र, काही दिवसापासून महापालिकेकडून क्रेन आणि डम्पर उपलब्ध होत नसल्याने वाहतूक शाखेच्या या मोहिमेला खीळ बसली आहे. 

रस्त्याकडेला होत असलेल्या बेवारस वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी वाढते. मागील काही महिन्यांत सुमारे 750 वाहनांवर कारवाई केली आहे. तर, वाहने उचलणे ही खर्चिक बाब असल्याने यासाठी क्रेन आणि डम्पर महापालिकेमार्फत उपलब्ध केल्यानंतर कारवाई केली जाते. सद्यस्थितीत अशा वाहनांवर कारवाई करण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ. 
- अमित काळे, 
उपायुक्त, 
वाहतूक शाखा, ठाणे 

स्मार्ट सिटीची स्वप्नं रंगवणाऱ्या ठाणे शहरातील रस्ते रुंद होत असले तरीही येथील पदपथ, मोकळ्या जागा, रस्त्यांच्या कडेला अथवा मैदानात धूळखात पडलेल्या चारचाकी गाड्यांचे खटारे पडलेले असतात. कोणीही वाली नसलेल्या या गाड्यांमुळे शहराच्या सौंदर्याला बट्टा लागतोच. मात्र अशा उघड्या बोडक्‍या गाड्यांमध्ये अडकून लहानग्यांचे मृत्यू झाल्याच्या घटनाही वारंवार घडल्या आहेत. गाड्यांचे सुट्टे पार्टस काढून विकणाऱ्या भुरट्या चोरांचीही त्यामुळे चांदी होते. असे प्रकार रोखण्यासाठी महापालिकेने आणि वाहतूक शाखेने तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. 
- सुभाष परब, 
दक्ष नागरिक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disruption of traffic in Thane due to Unmanned vehicles