संभाजी भिडेंच्या कार्यक्रमात गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

मुंबई - शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव येथील दंगलीत हात असल्याचा आरोप करीत आज दलित यूथ पॅंथरच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या सभेला विरोध केला. शिवडी येथील बारादेवी मनपा शाळेत आज संध्याकाळी 6 वाजता भिडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अशी मागणीदेखील भीम आर्मीच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, प्रचंड पोलिसांच्या बंदोबस्तात हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. दरम्यान, दलित यूथ पॅंथरच्या सुमारे दहा कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी धाव घेत संभाजी भिडे यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
भिडे यांचा लालबाग येथील गणेश गल्लीत व्याख्यानाचा कार्यक्रम होणार होता. मात्र, भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी मुंबई पोलिसांनी भिडे यांच्या कार्यक्रमाला परवानगी न देण्याची मागणी केली होती.
Web Title: Disturbance in Sambhaji Bhide Program