esakal | 18 कोटी मंजूर होऊनही दिव्याच्या जलवाहिनीचे घोडे अजून अडलेलेच ?
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

18 कोटी मंजूर होऊनही दिव्याच्या जलवाहिनीचे घोडे अजून अडलेलेच ?

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : एमआयडीसीची (MIDC) पाईपलाईन फुटल्याने कळवा, मुंब्रा, दिव्यातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागला. शिळफाटा (Shilfata) येथून एम. आय. डी. सी च्या पाईप लाईन वरून दिवा (Diva)- साबे करिता स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी 18 कोटीचा निधी मंजूर केला गेला आहे. मात्र या कामास अद्याप सुरवात झाली नसल्याने दिवेकरांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. या जलवाहिनी चे काम सुरू करा अशी मागणी माजी आमदार सुभाष भोईर (subhash Bhoir) यांनी ठाणे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

कल्याण शीळ रोडवरील एमआयडीसीची पाईपलाईन फुटल्याने दुरुस्ती च्या कामात वेळ गेला आणि दिवा, कळवा, मुंब्रा, मिरा भाईंदर परिसरातील नागरिकांना त्याचा तीन दिवस फटका बसला. याविषयी दै. सकाळने सोमवारी आढावा घेणारे वृत्त प्रसारित केले आहे. दिव्याचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर हे अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. याविषयी ते म्हणाले,

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील ठाणे महापालिका हद्दीतील दिवा साबे विभागात तीव्र पाणी टंचाई जाणवत असून नागरिकांना पाण्यासाठी अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. दिवा विभागातील एन. आर. नगर, नागवाडी, शनिवार वाडा, क्रिश कॉलनी, गावदेवी मंदिर, बंदर आळी, म्हात्रे आळी, मुंब्रा देवी कॉलनी, साबे गाव, डी. जी. कॉम्प्लेक्स या विभागात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई जाणवत आहे. पाणी टंचाईच्या निषेधार्थ दिवा विभागात पाण्यासाठी हंडा मोर्चा काढण्यात आला. आता एमआयडीसी ची पाईपलाईन फुटल्याने पुन्हा नागरिकांना पाणीबाणी चा सामना करावा लागला.

हेही वाचा: आयात कमी आणि मागणी वाढल्यानं कोळशाची टंचाई - केंद्र सरकार

येथील पाणी प्रश्न निकालात काढायचा असेल तर एम. आय. डी.सी च्या पाईप लाईन वरून दिवा साबे करिता स्वतंत्र जलवाहिनी टाकणे आवश्यक आहे. 2018 साली तत्कालीन आयुक्त संजीव जैस्वाल यांच्याकडे याविषयी मागणी केली होती. त्याची दखल घेत जलवाहिनीकरिता 18 कोटी 36 लाख रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे. 24 नोव्हेंबर 2020 मध्ये त्याचे कार्यारंभ आदेश देण्यात आला. कार्यारंभ आदेशापासून 18 महिन्याच्या कालावधीत काम पूर्ण करावयाचे असून अद्याप कामाला सुरुवात करण्यात आलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: मुंबईत परतीच्या पाऊसाला सुरुवात ?

हे काम लवकरात लवकर सुरू करावे. या ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकल्यास दिवा विभागाचा पुढील 25 वर्षे पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. तरी हे काम सुरू करण्याचे आदेश संबंधित विभागास द्यावे अशी मागणी भोईर यांनी निवेदनाद्वारे तत्कालीन आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना ऑक्टोबर महिन्यात केली आहे.

- 18 कोटीचा निधी मंजूर होऊनही स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याच्या कामास अद्याप सुरवात झालेली नाही

- कामासाठी पालिकेकडे निधी नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात असल्याची सुत्रांची माहिती आहे.

loading image
go to top