दिव्याचा उजेड पालिकेत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

ठाणे - पालिका निवडणुकीत दिवा परिसर राजकारणाचा प्रमुख केंद्रबिंदू ठरला होता. शिवसेना, भाजप आणि मनसेने या विभागावर विशेष लक्ष केंद्रित केले होते. दिव्यातून शिवसेनेला भरभरून मतदान झाल्याने पालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत या गावासाठी भरभरून प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत. येथूल नगरसेवक रमाकांत मढवी यांना उपमहापौरपदाची संधी दिल्यानंतर येथील विकासकामांचा धडाका पहिल्याच सर्वसाधारण सभेपासून सुरू होणार आहे. 

निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिवा गावात सभा घेऊन दिव्याच्या विकासाचे आश्वासन दिले होते; पण या दोन्ही पक्षांना येथे प्रतिसाद मिळाला नाही. त्या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दिवा गावाच्या विकासाचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सत्ता आल्यानंतर पहिल्याच महासभेत दिव्याच्या विकासाचे अनेक प्रस्ताव पालिकेने पुढे आणल्याने सत्ताधाऱ्यांसाठी ती जमेची बाजू ठरली आहे. 

या प्रस्तावात पोलिस ठाणे, बसस्थानक, मार्केट, संप व ईएसआर, प्रभाग कार्यालय, रुग्णालय, 15 मीटर रुंद रस्ता, पार्किंग आणि अग्निशमन केंद्राचा समावेश आहे. याचबरोबर रेल्वेने आगासन येथील सेक्‍टर 10 मधील 13.87 हेक्‍टरचे आरक्षण ताब्यात न घेतल्याने महापालिकेने अखेर या ठिकाणीही दिव्याच्या विकासासाठी योग्य ठरतील अशा प्रकल्पाचा नारळ फोडण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील फेरबदलाचा प्रस्ताव 20 मार्चच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. 

पालिकेच्या निवडणुकीत दिव्यातील वाढणाऱ्या नगरसेवकांच्या संख्येवर लक्ष ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी तेथे विकासगंगा आणण्याचा निर्णय घेतला होता. सत्ताधारी शिवसेनेनेसुद्धा दिव्याच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल, असे वचन दिले होते. त्यानुसार दिव्यातील सेक्‍टर- 10 मौजे आगासन येथील रेल्वेचे आरक्षण क्रमांक़ 1, क्षेत्र 13.87 हेक्‍टर असून याच ठिकाणी आता पालिका विविध प्रकल्प उभारणार आहे. आरक्षणासोभवताली 15 मीटर रुंद रस्ता तयार करण्यात येणार आहे. रस्त्यासंदर्भातील फेरबदलाचा प्रस्ताव पटलावर ठेवण्यात आला असून यापूर्वीच यासाठी आवश्‍यक असलेल्या हरकती व सूचना मागवण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे. त्यानुसार आता महासभेत याला मंजुरी मिळाल्यानंतर दिवा गावातील विकासकामांना सुरुवात होणार आहे. 

अशी मिळणार जागा 
प्रभाग समिती कार्यालय - 2.4 हेक्‍टर 
रुग्णालय - 2.4 हेक्‍टर 
बाजार - 3.01 हेक्‍टर 
पोलिस ठाणे - 1.5 हेक्‍टर 
अग्निशमन केंद्र - 0.74 हेक्‍टर 
पार्किंग - 0.75 हेक्‍टर 
पाण्याची टाकी - 1.09 हेक्‍टर 
बसस्थानक - 0.25 हेक्‍टर 

Web Title: Diva in thane municipal