दिव्यातील पाणीटंचाई प्रश्न गंभीर; पंधरा मिनिटे मिळणाऱ्या पाण्यातही किडे | Water scarcity | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water scarcity

दिव्यातील पाणीटंचाई प्रश्न गंभीर; पंधरा मिनिटे मिळणाऱ्या पाण्यातही किडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : ऐन नवरात्रोत्सवात (Navratri Festival) दिवा शहरात (diva) पाणीटंचाई (water scarcity) निर्माण झाली आहे. परतीच्या पावसाचे पाणी खिडकीत छत्री लटकवून नागरिकांना भरण्याची वेळ आली आहे. आता तर पाऊसही गेल्याने टँकरच्या पाण्यावर (tanker water) नागरिकांना अवलंबून राहावे लागते. दिवसातील दहा-पंधरा मिनिटे मिळणाऱ्या पाण्यातही किडे, अळ्या येत असल्याने ते पाणी पिता येत नाही. नगरसेवक येतात आणि जातात, प्रश्न मात्र सुटत नाही, अशी खंत नागरिक व्यक्त करीत आहेत. पाण्यासाठी आजी-माजी आमदार टाहो फोडत आहेत तर सत्ताधारी मात्र केवळ बैठकांमध्ये दंग असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 488 नव्या रुग्णांची भर; 5 जणांचा मृत्यू

स्मार्ट सिटी असलेल्या ठाणे महापालिकेचाच भाग असलेल्या दिव्यात विकासाच्या अनेक समस्या ‘जैसे थे’ आहेत. मग तो कचराभूमीचा विषय असो, रस्त्यांचा प्रश्न, अनधिकृत नळ जोडण्या, टँकरमाफियांचे राज असो की पाणीटंचाई. यातील एकही समस्या निकाली लावण्यात सत्ताधाऱ्यांना अद्याप यश आलेले नाही. नागरी वस्ती झपाट्याने वाढत असताना त्या प्रमाणात सोई-सुविधा मिळत नाहीत. परिस्थिती हलाखीची असल्याने जवळ दुसरा पर्याय नसल्याने नागरिक मुकाट्याने सर्व सहन करीत आहेत.

नवरात्रीत एमआयडीसीची पाईपलाईन फुटली आणि कळवा, मुंब्रासह दिव्यातील पाणीटंचाईच्या समस्येने पुन्हा एकदा डोके वर काढले. संतप्त महिलांनी हंडा मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले; मात्र उपयोग काही नाही. दरम्यान, दिव्यातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी माजी आमदार सुभाष भोईर यांनी आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी कळवा, मुंब्रा, दिवा भागातील पाणीटंचाईसंदर्भात ठाणे महापालिका आयुक्त व एमआयडीसी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत मजूर एमएलडी व जास्त दाबाने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच इतर प्रलंबित कामावरही या वेळी चर्चा करण्यात आली.

हेही वाचा: मुंबईतील 84 विहिरी गायब; RTI मध्ये माहिती उघड

"२००७ ला राहायला आलो तेव्हा सुरुवातीचे सहा महिने पाणी आले. त्यानंतर अजूनपर्यंत पाण्यासाठी झगडतोय. १५ वर्षांनंतर आता रस्ते बनविले जात आहेत. पाण्यासाठी रस्त्यावर उतरलो, मोर्चे काढले; पण प्रशासन, नगरसेवकांना त्याचे काही नाही. ते फक्त पोचार फिरवायचे काम करतात."
- लक्ष्मी गायकवाड, नागरिक

"आम्हाला १५ वर्षे झाली पाणी नाही आहे. दहा-पंधरा मिनिटे पाणी येते त्यात कपडे, भांडी, अंघोळ की पिण्याचे पाणी भरायचे. आम्ही तलावावर जाऊन कपडे-भांडी धुतो."
- सरिता मोहिते, स्थानिक

"पाणी येते त्यातही कधी फेसयुक्त तर त्याला वेगवेगळे रंग असतात. त्यात किडे, अळ्याही आहेत. पिण्यायोग्य नसलेले पाणी पिऊन आम्ही दिवस काढत आहोत."
- रेणुका गायकवाड, स्थानिक


"वर्षभरापूर्वी आयुक्तांना दिव्यात येऊन पाहणी करावी अशी मागणी केली आहे; मात्र अद्याप
त्यांनी वेळ दिलेली नाही. आम्ही नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करत आहोत. अनधिकृत बांधकामांचा मलिदा खाण्यासाठी दिवा शहर लागते; मात्र दिव्यात कुठलीच कामे केली जात नाहीत."
- राजू पाटील, आमदार, मनसे

"भाजपने गेली कित्येक वर्षे दिव्यातील समस्यांवर आंदोलने केली आहेत; मात्र पालिका आम्हाला केवळ आश्वासने देत आली. आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांनी पाणीप्रश्नासंदर्भात अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना समस्या सांगितली आहे. सत्ताधारीच या सर्व समस्यांना कारणीभूत असून नगरसेवकांचे हे अपयश आहे."
- रोहिदास मुंडे, पदाधिकारी, भाजप

loading image
go to top