घटस्फोटित पित्याकडे मुले राहू शकतात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

घटस्फोटाच्या प्रकरणात अनेकदा एकाच पालकाकडे अल्पवयीन मुलांचा ताबा सोपवला जातो. ताबा न मिळालेल्या पालकाबाबत अकारण मुलांच्या मनात गैरसमज निर्माण होतात, असे बहुतेक वेळा आढळले आहे. 

मुंबई : मुलांना आई आणि वडील अशा दोघांच्याही मायेची गरज असते. केवळ एकाला मुलाचा ताबा दिल्यास दुसऱ्या पालकाबाबत मुलाच्या मनात किल्मिष निर्माण होते, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. या प्रकरणी घटस्फोटित वडिलांकडे दोन मुलांना राहण्याची परवानगी न देण्याची आईची मागणीही उच्च न्यायालयाने अमान्य केली.

घटस्फोटाच्या प्रकरणात अनेकदा एकाच पालकाकडे अल्पवयीन मुलांचा ताबा सोपवला जातो. ताबा न मिळालेल्या पालकाबाबत अकारण मुलांच्या मनात गैरसमज निर्माण होतात, असे बहुतेक वेळा आढळले आहे. ताबा न मिळालेल्या पालकाशी दीर्घ काळाने भेट होत असल्यामुळे त्याच्याबाबत मुले चुकीचा ग्रह करून घेतात. त्यामुळे मुले या पालकाशी प्रेमाने वागत नाहीत, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. 

कधीकधी सोबत राहणारे पालक मुलांच्या मनात दुसऱ्या पालकाबद्दल चुकीच्या गोष्टी भरवतात. त्यामुळेही मुलांची मूळ इच्छा दूर सारली जाते आणि त्यांच्यावर दबाव येतो. त्यातून मुलांची दूर असलेल्या पालकाशी जवळिक निर्माण होत नाही. 
घटस्फोटित दाम्पत्यांच्या मुलांसाठी ही परिस्थिती हितकारक नसते; त्यांना आई आणि वडील अशा दोघांचेही प्रेम आणि सहवास मिळायला हवा, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. 

नाते अधिक सुदृढ होईल
मुलांचा ताबा वडिलांना देण्यास हरकत नाही. त्यामुळे त्या दोघांमधील नाते अधिक सुदृढ आणि मुलांच्या वाढीसाठी पोषक होऊ शकेल, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आणि कुटुंब न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. आई सध्या बडोद्यात मुलांसोबत असून, सुटीत मुलांचा ताबा वडिलांकडे द्यावा, असा आदेश न्यायालयाने दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The divorced father can have children