मुख्यमंत्री, ठाकरेंना महिला दिव्यांग सेनेतर्फे बांगड्यांचा आहेर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

भांडुप - दिव्यांग सेनेकडून त्यांच्या हक्कासाठी अनेक मोर्चे काढण्यात आले; मात्र त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्यामुळे तसेच सरकारकडूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता. 3) आंतरराष्ट्रीय अपंग दिनानिमित्त फोर्ट येथे मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना महिला दिव्यांग सेनेतर्फे बांगड्यांचा आहेर देण्यात आला. 

या वेळी दिव्यांग सेनेकडून अनेक वेळा आवाज उठवण्यात आला आहे; मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. 21 ऑक्‍टोबर रोजी दिव्यांग सेनेकडून मातोश्रीवर धडक मोर्चा काढण्यात आला होता; मात्र त्या वेळी उद्धव ठाकरे जाणूनबुजून शिर्डीला गेले, असा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे. त्यानंतर 18 नोव्हेंबर रोजी भांडुपमध्ये मोर्चा काढण्यात आला. त्या वेळीही भाजप-शिवसेनेकडून कोणीही त्यांच्याशी बोलण्यास आले नाही. दिव्यांग सेनेकडे त्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केले, असे संघटनेचे म्हणणे आहे. 

त्या वेळी हातात थाळी घेऊन "भीक द्या, भीक द्या' अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या होत्या. 

स्वबळावर जगण्यासाठी आमची धडपड आहे. स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न आम्ही प्रत्येक जण पाहतो; मात्र सत्तेत असणाऱ्या शिवसेना आणि भाजपची दिव्यांगांविषयी उदासीन भूमिका आहे. त्यामुळे दिव्यांगांना आजही हलाखी आणि मजबुरीचे जीवन जगावे लागत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया महिला दिव्यांग सेनेच्या वतीने मुंबई उपाध्यक्ष रश्‍मी कदम यांनी व्यक्त केली. 

मागण्या काय? 
प्रत्येकाला रोजगाराचा हक्क आहे. त्यामुळे एका अपंगाला एक स्टॉल किंवा त्या बेरोजगार अपंगाला 10 ते 15 हजार भत्ता देण्यात यावा. महापालिकेच्या रुग्णालयात अपंगांवर मोफत उपचार करण्यात यावेत, तसेच त्यांना मोफत घरकुले देण्यात यावीत. अपंगांसाठीचा निधी त्यांच्या कल्याणासाठी वापरला जावा, अशा अनेक मागण्या दिव्यांग सेनेकडून करण्यात आल्या आहेत. 

दिव्यांग सेनेकडून करण्यात आलेल्या मागण्यांपैकी कोणत्याही मागणीची पूर्तता अजूनही झालेली नाही. शिवाय आमची वेळोवेळी थट्टा करून, फजिती केल्याने आंतरराष्ट्रीय अपंग दिनानिमित्त मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना महिला दिव्यांग सेनेने बांगड्यांचा आहेर दिला आहे. 
- रश्‍मी कदम, मुंबई उपाध्यक्ष, महिला दिव्यांग सेना 

Web Title: Divyang sena give Bangles to Devendra fadnavis & Uddhav thackeray