मशाली पेटवून रायगडावर दिवाळी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

महाड - "छत्रपती शिवाजी महाराज की जय'च्या जयघोषात व तळपत्या मशालींच्या प्रकाशात काल (ता. 27) मध्यरात्रीनंतर रायगड उजळून निघाला. यंदाच्या 344 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 344 शिवभक्तांनी 344 मशाली प्रज्वलित करून गडावर रोषणाई केली.

महाड - "छत्रपती शिवाजी महाराज की जय'च्या जयघोषात व तळपत्या मशालींच्या प्रकाशात काल (ता. 27) मध्यरात्रीनंतर रायगड उजळून निघाला. यंदाच्या 344 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 344 शिवभक्तांनी 344 मशाली प्रज्वलित करून गडावर रोषणाई केली.

स्वराज्याची राजधानी दिवाळीच्या पहिल्या दिवशी अंधारात राहू नये, या हेतूने काही वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गडावर दिवाळी साजरी केली. या उपक्रमात हिंदू-मुस्लिम शिवभक्त महिला मोठ्या संख्येने सामील झाल्या. या सोहळ्यासाठी सनी ताठेले, रंजन गावडे, प्रवीण मोहिते, समीर वारेकर, महम्मद अली यांनी मेहनत घेतली. किल्ल्यावरील धनगर वस्तीत दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. रायगडावर तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करणाऱ्या या समितीतर्फे काही वर्षांपासून गडावर अशी दिवाळी साजरी केली जाते. ही ऊर्जा घेऊन परतणारे शिवभक्त मग घरोघरी आनंदाने दिवाळी साजरी करतात. राजसदर, बाजारपेठ, होळीचा माळ, जगदीश्‍वर मंदिर मार्ग यावर मशाली उजळल्या. त्यानंतर शिर्काई मंदिरापासून राजदरबारापर्यंत शिव प्रतिमेची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.

धर्मभेदापलीकडे!
या सोहळ्याला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी सांगितले. दरवर्षी तिथीप्रमाणे होणाऱ्या शिवराज्याभिषेकाला आवर्जून हजेरी लावणाऱ्या हमिदा खान म्हणाल्या, ""मी मुस्लिम असले, तरी मला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप आदर आहे. सर्वधर्मीयांचे सर्व सण सर्वांनीच साजरे केले, तर धर्माधर्मातील अंतर कमी होईल.''

Web Title: Diwali celebration in Raigad