डोंबिवलीच्या फडके रोडवर तरुणाईचा जल्लोष 

तरुणाईची झालेली गर्दी
तरुणाईची झालेली गर्दी

ठाणे : ढोल-ताशांचा गजर... त्यावर थिरकणारी पावले... पारंपरिक पोशाखात नटून आलेली तरुणाई आणि त्यांच्या ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात आज "दिवाळी पहाट' साजरी झाली. डोंबिवली या सांस्कृतिक नगरीतील फडके रोडवरील "दिवाळी पहाट'ची मज्जा अनुभवण्यासाठी मुंबईतील तरुणाईही आली होती. सकाळपासूनच फडके रोड परिसरात तरुणाईने गर्दी केली होती. या तरुणाईच्या उत्साहात आणखी भर पडली, ती ढोल-ताशा पथकांच्या वादनाने. वादकांच्या उत्साहाबरोबर तरुणाईचाही जोश वाढत होता, ढोल-ताशांच्या गजरावर पावले थिरकत तरुणाईने त्यांना साथ दिली. 

गेली कित्येक वर्षे येथील फडके रोडवर "दिवाळी पहाट' हा कार्यक्रम साजरा केला जात आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी, कलाकारांची मांदियाळी आणि तरुणांचा उत्साह या पहाटेला दिसून येतो. तरुणांचा उत्साह हाच या दिवसाचे खास आकर्षण असते. यावर्षी रविवारी दिवाळी पहाट आल्याने गर्दीचे प्रमाण अधिक दिसून आले. डीजे किंवा इतर गीतांवर ठेका धरण्यापेक्षा यंदा तरुणाईने ढोल-ताशांच्या गजरावर ठेका धरल्याने पारंपरिक वाद्यांची आवड आजच्या तरुणाईला असल्याचे प्रकर्षाने जाणवले.

चार ते पाच ढोल-ताशा पथक या वेळी फडके रोडवर होते. पथकांचे वादन पाहण्यासोबतच त्यांच्या वाद्यावर तरुणाईने ठेका धरत त्यांच्या उत्साहात भर पाडली. गणपती मंदिरात गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर फडके रोडवर मित्र-मैत्रिणींच्या गाठी-भेटी घेत त्यांना शुभेच्छा देत होते. शुभेच्छा दिल्यानंतर ग्रुपसोबत सेल्फीही घेतले जात होते. 

कलाकारांची उपस्थिती 
दिवाळी पहाटेला उसळणाऱ्या तरुणाईचा उत्साह वाढविण्यासाठी डोंबिवलीतील कलाकारांनीही कार्यक्रमांना उपस्थिती लावत त्यांचा उत्साह द्विगुणीत केला. झी मराठी वाहिनीवर गाजत असलेली सासू सुनेची जोडी "अग्गबाई सासूबाई' मालिकेतील तेजश्री प्रधान आणि निवेदिता सराफ उपस्थित होते. तसेच खारी बिस्किट चित्रपटातील वेदश्री खाडीलकर, आदर्श कदम हे बालकलाकारही या वेळी उपस्थित होते. 

आमदारांचीही हजेरी 
विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच लागले असून डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण व कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनीही दिवाळी पहाटानिमित्त फडके रोडवर हजेरी लावत तरुणाईला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. 


वाहतूक कोंडी 
दिवाळी पहाटनिमित्त फडके रोडवरील वाहतूक बंद होती. मात्र, फडके रोडसह अंतर्गत रस्त्यांवरही तरुणाईची गर्दी असल्याने त्या ठिकाणी नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. नेहरू रोड, स्टेशन परिसरात प्रामुख्याने ही कोंडी दिसून आली. तसेच दुचाकीवरून जाणारे तरुण हे कर्णकर्कश्‍श हॉर्न वाजवून रस्त्यावर फेऱ्या मारत होते. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com