दिवाळी अंकांनाही महागाईचे ग्रहण 

दिवाळी अंकांनाही महागाईचे ग्रहण 

मुंबई - दिवाळीनिमित्त वाचक आतुरतेने वाट पाहत असलेल्या साहित्य फराळालाही महागाईची झळ सोसावी लागत आहे. दिवाळी अंकांच्या किमतीमध्ये यंदा 10 ते 15 टक्के वाढ झाली आहे. दिवाळी अंकांच्या संच योजनेचे दरही 50 ते 100 रुपयांनी वाढले आहेत. जाहिरातींचे कमी आणि कागद व छपाईची किंमत वाढल्याने असा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती वितरकांनी दिली. 

महाराष्ट्राच्या दिवाळी अंकांना 100 वर्षांची परंपरा आहे. दिवाळी अंक महागलेतरी त्यांचा ठरलेला वाचक ते बाजारात आल्यावर आवर्जून विकत घेतात. ग्रंथालयांमधील दिवाळी अंक योजना माध्यमातून वाचकांच्या घरी दिवाळी अंक पोहचतात. त्यातून वाचक वर्ग जोपासला जात आहे. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बाजारात दिवाळी अंकांचे प्रमाण कमी असेल. विशेष म्हणजे, यंदा दिवाळी अंक फारसे आलेलेही नाही. दर वर्षी प्रकाशित होणारे 15 ते 20 अंक यंदा बंद पडले आहेत. दिवाळी अंकांमधील जाहिरातींचे प्रमाण घटल्याने आणि कागद व छपाईची किंमत वाढल्याने दिवाळी अंकांचे दर वाढवण्यात आले असल्याची माहिती दिवाळी अंकांचे वितरक हेमंत बागवे यांनी दिली. या वर्षी विविध प्रकाशकांनी आपल्या दिवाळी अंक योजनेच्या दरातही वाढ केली आहे. गेल्या वर्षी दिवाळी अंक संच योजना 800 ते 850 रुपयांपर्यंत उपलब्ध होती; मात्र यंदा त्यांच्या किमतीत 50 ते 100 रुपयांनी वाढ झाली आहे. दादर सार्वजनिक वाचनालय, विलेपार्ले लोकमान्य सेवा संघाचे ग्रंथालय अशा ग्रंथालयांमध्ये दिवाळी अंक योजना राबवली जाते. दादर सार्वजनिक वाचनालयात अवघे 200 रुपयांमध्ये सभासदांना दिवाळी अंक वाचता येणार आहे. अंकांचे दर वाढले तरी ग्रंथालयातील दिवाळी अंक योजनेमुळे वाचकवर्ग दिवाळी अंकाकडे टिकून आहे. 

सहा अंकांसोबत मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रकाशित केलेले एक पुस्तक असा संच 970 रुपयांमध्ये वाचकांसाठी उपलब्ध केला आहे. आयडिअल बुक डेपोमध्ये 25 ऑक्‍टोबरपासून दिवाळी अंक प्रदर्शन सुरू होणार आहे. एक ते पाच अंकांवर 10 टक्के सूट, सहा ते 19 अंकांवर 15 टक्के आणि 20 किंवा त्यापेक्षा जास्त अंकांवर 20 टक्के सूट देण्यात येणार आहे. दर वर्षी अनेक अंक नवीन येतात. बरेच अंक आर्थिक गणित न जुळल्याने बंद पडतात. मौज, दीपावली, अक्षर, ऋतुरंग, हंस, मेनका आदींसारख्या दर्जेदार दिवाळी अंकांना वाचकांकडून सातत्याने मागणी असते. पर्यटन आणि आरोग्यविषयक अंकांनाही वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळतो, अशी माहिती आयाडियल बुक डेपोच्या दिवाळी अंक वितरण विभागाने दिली. 

सरकारी जाहिरातींमुळे दिलासा 
यंदा दिवाळी अंकांमध्ये जाहिरातींचे प्रमाण 75 टक्के आहे. या वर्षी खासगी कंपन्या आणि व्यावसायिकांच्या जाहिरातींचे प्रमाण कमी झाले; मात्र सरकारी जाहिरातींचे प्रमाण वाढले आणि दिवाळी अंकांच्या जाहिरातींमध्ये समतोल राखला गेला. त्यामुळे दिवाळी अंकांच्या आर्थिक गणितावर जाहिरातींमुळे फारसा परिणाम झाला नाही. दिवाळी अंकांचे दर वाढले तरी वाचक वर्ग घटलेला नाही, अशी माहिती बी. वाय. पाध्ये पब्लिसिटीचे विजय पाध्ये यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com