आली दिवाळी, बाजाराला झळाळी

शरद वागदरे
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

दिवाळीत खरेदीचा उत्साह जोरात असल्याचे पाहायला मिळत आहे. पूजेच्या साहित्याबरोबर इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, वाहन खरेदी, घर खरेदीलाही दिवाळीचा मुहूर्त साधला जात आहे. दिवाळीनिमित्त शहरामध्ये बाजारपेठेच्या भागाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले पाहायला मिळत आहे.

नवी मुंबई : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. मात्र, आता दिवाळीत खरेदीचा उत्साह जोरात असल्याचे पाहायला मिळत आहे. पूजेच्या साहित्याबरोबर इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, वाहन खरेदी, घर खरेदीलाही दिवाळीचा मुहूर्त साधला जात आहे. दिवाळीनिमित्त शहरामध्ये बाजारपेठेच्या भागाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले पाहायला मिळत आहे.

दिवाळीनिमित्त शहरातील वाशी, एपीएमसी मार्केट येथे ग्राहकांची गर्दी वाढली आहे. वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, नेरूळ आदी ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा, तसेच पदपथांवर विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. त्यामुळे या रस्त्यावर चालणेही अवघड झाले आहे. रविवारी लक्ष्मीपूजनाचा दिवस असल्यामुळे पूजेचे साहित्य, फराळ, मिठाई खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी होत आहे.

पूजेच्या साहित्याला मागणी
रविवारी (ता.२७) लक्ष्मीपूजन असल्याने महिलांची लगबग बाढली असून, लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या पूजेच्या साहित्यांनी बाजारपेठ सजली आहे. शहरातील वाशी येथील शिवाजी चौक, सीबीडी-बेलापूर येथील पनवेलमधील शिवाजी चौक परिसरात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी झाली आहे. झेंडूची फुले, पूजेचे साहित्य, रांगोळी, ऊस, केळीची पाने, नारळ, आंब्याची पाने, केळीचे खांब व लक्ष्मीच्या मूर्तीची खरेदी करण्यात येत आहे.

झेंडूच्या फुलांना मागणी
सणासुदीत पूजेसाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. दिवाळीसारख्या सणाला फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. रविवारी लक्ष्मीपूजन असल्यामुळे बाजारपेठेत झेंडूच्या फुलांची मागणी वाढली आहे. झेंडूच्या फुलांचे भाव १०० रुपये किलोपर्यंत पोहचले आहेत. फुलांच्या मागणीत वाढ झाल्याने हे दर वाढलेले आहेत, असे विक्रेते अनंता बोजहाडे यांनी सांगितले. फुलाबरोबरच झेंडूच्या फुलांच्या माळांचीही मागणी वाढली आहे.

इलेक्ट्रिक वस्तूंची खरेदी जोरात
इलेक्‍ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी ग्राहकांमध्ये चांगला उत्साह पाहायला मिळत आहे. शहरातील जवळजवळ सगळ्याच इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंच्या शोरूममध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंमध्ये यंदा प्रामुख्याने एलईडी टीव्हीला मोठी मागणी असून, सर्वाधिक खरेदी ही एलईडी टीव्हीची झाली असल्याची माहिती किग्स इलेक्‍ट्रॉनिक्‍सचे सुरेश पटेल यांनी सांगितले.

तरुणाईची कपडे खरेदी
डिझायनर ड्रेस मटेरिअल, कॅटलॉक, पाटियाला, पार्टी वनपीस, कुर्ती असे विविध प्रकाराच्या ड्रेसची युवतींमध्ये चलती आहे; तर तरुणांमध्ये जीन्स, पार्टी वेअर शर्ट, प्रिटेंड शर्ट, टी-शर्ट यांची क्रेझ जास्त आहे. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर मागणी वाढल्याचे विक्रेते सुरेश अग्रवाल यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali, the market sheen