आयुष्याचे सार जपणारी दिवाळी साजरी करा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

अभिनेत्री स्मिता तांबे यांनी उलगडला दिवाळीचा अर्थ

अभिनेत्री स्मिता तांबे यांनी उलगडला दिवाळीचा अर्थ

मुंबई - दिवाळी हा आयुष्याचे सार सांगणारा सण आहे, त्यातील प्रत्येक दिवसात आपल्या जीवनाचे विविध पैलू दाखवणारा संपूर्ण अर्थ भरला आहे, तर फटाके हा त्यातील केवळ एक दिखाव्याचा मार्ग आहे, त्याने आपल्याला सणाचा आनंद मिळणार नाही. उलट फटाके न वाजवता पर्यावरणाला मान द्या, हीच खरी दिवाळी!
दिवाळीपूर्वी आपण घराची स्वच्छता करतो. तसेच आपल्याला त्रास देणारे मनातले निरुपयोगी विचार काढून टाकावेत. माणसाप्रमाणेच पशू-पक्ष्यांचाही या जगावर हक्क आहे, ते आपले सहकारी आहेत, ही भावना वसुबारसमुळे मिळते. आपण अमर आहोत असेच जगत असतो, मात्र मृत्यूला स्वीकारून जीवनाचा आनंद घ्या, हेच यमदीपनाचा दिवस सांगतो. आपल्यात "स्व' नसेल तर काहीच होणार नाही, "स्व' म्हणजे अहंकार नसून स्वतःला मान देणे, असे आहे. आपण आपल्या शरीरावर, त्याच्या आरोग्यावर प्रेम केलेच पाहिजे, त्यासाठी अभ्यंगस्नान आवश्‍यक आहे.

लक्ष्मीपूजन हा असाच विशेष दिवस, प्रत्येकाचे जगणे हे पोटासाठी असते. मात्र हे आपले अर्थार्जन हे सुलक्ष्मीचे हवे, जादा नको, आपल्या हक्काचा तेवढाच पैसा मिळवावा, असा लक्ष्मीपूजनाचा अर्थ आहे. पाडवा आणि भाऊबीज हे दोनही सण नातेसंबंध जोडण्यात अत्यंत महत्त्वाचे आहेत. माणूस हा नात्याने बांधलेला असून त्याचे प्रतीक हे दोन दिवस आहेत. अशा दिवसांत आपण रांगोळ्या काढाव्यात, फुलांची आरास करून घर सजवावे, आपले जगणे अजून प्रफुल्लित करावे, हीच खरी दिवाळी आहे.

फटाके हा दिवाळीतील केवळ बाह्य देखावा आहे. मात्र दीपमाळ लावून जो आनंद मिळेल तो फटाक्‍याने मिळणार नाही. फराळ, पूजा हाच दिवाळीतील खरा आनंद आहे, तो साधण्यासाठी या सणाचा खरा अर्थ जाणून घ्या. मला स्वतःला फटाक्‍यांची भीतीच वाटते, लहानपणीही आम्ही फक्त शोभेचेच फटाके, ते देखील मैदानातच वाजवत होतो. आता आपल्याकडे एवढे प्रदूषण आहे की त्यात आणखी भर घालण्याची गरजच नाही.

Web Title: Diwali message by Smita Tambe