सगळीकडे होतेय दिवाळी जोरात साजरी; पण मुंबईत...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

सणाचा उत्साह असताना दुसरीकडे तीन लाख बेघरांची दिवाळी मात्र अंधारात आहे. रोज रोजी रोटीची चिंता असल्याने दिवाळी सण ही त्यांच्यासाठी दूरची गोष्ट आहे.

मुंबई : घरोघरी गोडधोडाची रेलचेल आहे. दिवाळीचा लखलखाट आणि खरेदीची झुंबड दिसत आहे. सणाचा उत्साह असताना दुसरीकडे तीन लाख बेघरांची दिवाळी मात्र अंधारात आहे. रोज रोजी रोटीची चिंता असल्याने दिवाळी सण ही त्यांच्यासाठी दूरची गोष्ट आहे. मात्र, काही दानशूर व्यक्ती सोडले तर त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही, अशी दयनीय स्थिती दिवाळीत बेघरांची आहे.

मुंबई गेल्या 2011 मध्ये झालेल्या जनगणनेच्या सर्वेक्षणात मुंबईत 57 हजार 450 बेघर असल्याचे आढळून आले होते. आता मुंबईत बेघरांची संख्या 3 लाखावर गेल्याची माहिती बेघरांमध्ये काम करणाऱ्या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून आढळून आले आहे.

जग सुधारेल, कोल्हापूर नाही; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर संताप

पुलाखाली, पुलावर, फूटपाथवर आदी ठिकाणी जागा मिळेल, त्या ठिकाणी बेघर राहत आहेत. त्यांना हातावर पोट भरावे लागते. अत्यंत असुरक्षित स्थितीत त्यांना जगावे लागत आहे. गुजरात आणि महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतील ग्रामीण भागातून तसेच इतर राज्यांतून आलेल्या लोकांना मुंबईत कोणतीही जागा नसल्याने त्यांना रस्त्यावर रहावे लागत आहे. हे बेघर दुर्बल घटकातील आहेत.

मुंबईत हाताला मिळेल ते काम करून पोट भरीत आहेत. रोजी रोटीचा सवाल रोजचाच असल्याने दिवाळी कशी करायची असा त्यांच्या पुढे प्रश्‍न आहे. त्यांच्यासाठी मुंबई महानगर पालिकेने निवारे उभारलेले नाहीत. देशातील महत्वाच्या शहरांमध्ये तिथल्या प्राधिकरणांनी बेघरांसाठी निवारे उभारले आहेत. मात्र, मुंबईत कुठेही बेघरांसाठी निवारे नाहीत. त्यामुळे बेघर सहकुटुंब उघड्यावर राहत आहेत. अत्यंत हालाखीच्या आणि दयनीय स्थितीत ते वर्षानुवर्षे राहत असूनही त्यांच्याकडे कोणाचेही लक्ष नाही. हातावर पोट भरणाऱ्या या बेघरांची दिवाळी अंधारात आहे. 

उन्माद म्हणजे, उदयनराजे; शिवसेनेने काढले चिमटे

मुंबईतील बेघरांसाठी दिवाळी हे स्वप्न आहे. मुंबईतील बेघरांच्या समस्येकडे कोणत्याही सरकारचे आणि राजकीय पक्षाचे लक्ष नाही. त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला आदेश दिले आहेत. त्यानुसार नॅशनल अर्बन लिव्हलीहूड मिशन (एनयुएलएम) तयार केले आहे. शहरात सहकुटुंब राहत असलेल्या बेघरांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे द्या, त्यांच्यासाठी पालिकेने निवारे बांधावेत अशी आम्ही बेघरांसाठी सतत मागणी करीत आहे. मात्र, त्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. 

- ब्रिजेश आर्य, संयोजक, महाराष्ट्र राज्य बेघर अभियान.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali of three lakh homeless is in the dark in Mumbai