पार्ट्यांवर नजर 

police
police

बदलापूर - ग्रामीण भागातील उल्हास नदी आणि अन्य मुख्य रस्त्यांच्या जवळ असलेल्या फार्म हाऊसमध्ये थर्टीफस्टच्या पार्ट्या करणे आता पोलिसांच्या जाचक अटींमुळे जोखमीचे ठरणार आहे. डीजे, डॉल्बीवरही पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. परवान्याशिवाय मद्य प्राशन केल्याचे आढळल्यास कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. त्यामुळे येत्या थर्टीफस्ट व नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर असणार हे आता स्पष्ट झाले आहे. 

चौथी मुंबई म्हणून नावारूपास येणाऱ्या बदलापूर शहराकडे उच्चभ्रू मुंबईकर सेकंड होम म्हणूनही पाहतात. त्यामुळे बदलापूरच्या निसर्गसंपन्न वातावरणात अनेक मुंबईकरांनी फार्महाऊस विकत घेतले आहेत. बदलापूर ते वांगणी परिसरात उल्हास नदी, बारवी नदीच्या किनारी तसेच मुख्य रस्त्यापासून जवळ मोठ्या प्रमाणावर फार्म हाऊस आहेत. येथे अनेक छोट्यामोठ्या पार्ट्या होत असतात. थर्टीफस्ट व नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांसाठीही याच फार्महाऊसचा पर्याय अनेक जण निवडतात. 

अनेक फार्म मालक स्वतः येथे नववर्षाच्या स्वागताच्या पार्ट्यांसाठी येत असतात; मात्र अनेक फार्महाऊस पार्टीसाठी भाड्याने दिले जातात. त्यामुळे येथे अनियंत्रितपणे जल्लोष केला जातो. त्यात मद्यपींचाही समावेश असतो. मोठ्या आवाजात डीजेचा वापरही केला जातो. मुंबई-पुणे यासारख्या मोठ्या शहरांत गाजलेल्या रेव्ह पार्ट्यांवर कारवाई झाल्याने या परिसरात अशा प्रकारच्या पार्ट्या होत आहेत अशी चर्चा सुरू आहे. या सर्वांमध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी ग्रामीण पोलिसांनी आता कंबर कसली असून नववर्षाच्या पार्ट्यांपूर्वीच सर्वच फार्महाऊसेसना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 

थर्टीफस्ट नववर्ष स्वागतासाठी कोणताही कार्यक्रम करायचा असल्यास त्यापूर्वी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच यामध्ये कोणत्याही प्रकारचा डीजे आणि डॉल्बीचा वापर करता येणार नाही. ध्वनिक्षेपक लावायचे असल्यास न्यायालयाच्या आदेशांचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी लावण्यात येणाऱ्या अनिर्बंध आवाजावर बंधन येणार आहे. कुळगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय पोरे यांनीही या माहितीला दुजोरा दिला असून नोटीस देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

धाब्यांचे दणाणले धाबे 
नववर्ष स्वागतासाठी दारूचा साठा आणि वाहतूकही केली जाते. यासाठीही परवाना अनिवार्य करण्यात आला असून ग्रामीण भागातील अनेक धाब्यांवर होत असलेल्या अवैध दारूविक्रीवरही पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. आतापासूनच धाडसत्र सुरू केले असल्याचे उत्पादन शुल्क विभागाचे अ. बा. पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे येत्या 31 डिसेंबरचे सेलिब्रेशन करायचे असल्यास तळीरामांच्या सोयीसाठी आयोजकांना पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. 

स्वागत अगोदरच 

पोलिसांचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून तळीराम विविध पर्याय शोधत असतात. थर्टीफस्ट साजरे करण्यासाठी 31 तारखेपर्यंत न थांबता आधीच "सण' साजरा करण्याचा पर्यायही काहींनी अवलंबला आहे. पोलिसांची परवानगी घ्यायला जायचे म्हणजे त्यांचा खिसा ओला करावा लागण्याची शक्‍यता काहींनी व्यक्त केली आहे. परवानगी सहजासहजी मिळेल की नाही अशीही शंका काहींनी व्यक्त केली आहे. या सर्व द्राविडी प्राणायामामुळे न घेताच किक बसण्याची शक्‍यताही व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com