'विकासकामांत नका करू तडजोड'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

कल्याण - रस्ते चांगले असणाऱ्या शहराचा विकास जलदगतीने होतो. शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी रस्त्यांचा विकास होणे गरजेचे आहे. विकासकामे करत असताना गुणवत्तेत तडजोड करू नका, असे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले. 

कल्याण - रस्ते चांगले असणाऱ्या शहराचा विकास जलदगतीने होतो. शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी रस्त्यांचा विकास होणे गरजेचे आहे. विकासकामे करत असताना गुणवत्तेत तडजोड करू नका, असे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले. 

कल्याण पूर्वेतील चेतना शाळा ते नेवाळी नाका मलंगगड रोड १०० फुटी रस्ता कामाचे पालकमंत्री शिंदे व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी (ता. १५) भूमिपूजन झाले. या वेळी शिंदे बोलत होते. खासदार श्रीकांत शिंदे, आमदार गणपत गायकवाड, महापौर राजेंद्र देवळेकर, उपमहापौर मोरेश्‍वर भोईर, पालिका आयुक्त योगेश म्हसे, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, गटनेते रमेश जाधव, स्थानिक अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील आदी  कार्यक्रमास उपस्थित होते.

चेतना शाळा ते नेवाळी नाका या मलंगगड रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असल्याने स्थानिक अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्यासह आमदार गायकवाड, खासदार शिंदे आणि लोकप्रतिनिधींनी रस्त्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. नगरसेवक पाटील यांनी तीन वेळा रास्ता रोकोही केला होता. त्यांचे पालकमंत्र्यांनी अभिनंदन केले. आज भूमिपूजन नव्हे, वचनपूर्ती झाल्याचे सांगत त्यांनी विकासकाम करताना बाधित होणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करण्याचे आवाहनही या वेळी केले. शहरातील विकासकामांची जबाबदारी अधिकाऱ्यांची असून, लोकप्रतिनिधींनी त्याकडे लक्ष देणे आवश्‍यक असल्याचे राज्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले. त्यांनीही नगरसेवक पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याबाबत त्यांचे अभिनंदन केले.

चेतना शाळा ते नेवाळी नाका हा १०० फुटी रस्ता १८ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या रस्त्यांचे काम पालिकेचे प्रकल्प अधिकारी सुनील जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून, ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. नगरसेवक पाटील, पालिका अधिकारी सुनील जोशी यांनी स्वागत केले.

Web Title: Do not compromise development