लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला नको

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 September 2019

लेखकाला लेखनाचे स्वातंत्र मिळायला हवे. त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुणीही घाला घातला काम नये, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

वसई: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होईल, ही अपेक्षा नव्हती. या निवडीमुळे मला आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी रविवारी दिली. लेखकाला लेखनाचे स्वातंत्र मिळायला हवे. त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुणीही घाला घातला काम नये, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी समाजातील सर्व घटकांनी काम करायला हवे. मराठीवर प्रत्येकाचे मराठी भाषकाचे प्रेम असायला हवे. मातृभाषेचा अवमान होऊ नये, ही काळजीही घ्यायला हवी. मराठी भाषेसाठी मी उभारलेली चळवळ अखेरपर्यंत सुरूच असेल. इंग्रजी ही व्यावसायिक तर मराठी ही आपली मातृभाषा आहे. तिला नेहमी प्रथम स्थान द्यायला हवी. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर माझे अभिनंदन करण्यासाठी अनेक दूरध्वनी आले. त्यांना मी हेच सांगितले. लेखक- कवींना मुक्त वातावरणात लिहिता यावे, यासाठी एकत्र येऊ या, असे आवाहनही मी त्यांना केले. 

अभिनंदनाचा वर्षाव
फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीची बातमी समाजमाध्यमांतून पसरल्यानंतर समजातील विविध स्तरांतून  त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. अनेकांनी दिब्रिटो यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले. अरुणा ढेरे, श्रीपाद जोशी, मंगेश वैश्‍यपायन , सुकृत मोकाशी (बेळगाव), पद्माकर कुलकर्णी (उस्मानाबाद) यांच्यासह अनेक विचारवंत, साहित्यिकांनी त्यांचे भ्रमणध्वनीवरून अभिनंदन केले. वसईतले कवी सायमन मार्टिन, प्रकाश पाटील, डिम्पल पब्लिकेशनचे अशोक मुळ्ये यांच्यासह अनेकांनीही त्यांचे अभिनंदन केले.

दरम्यान, कविवर्य ना. धों. महानोर यांनी स्वागत केले आहे. तसेच, निवड प्रक्रिया बिनविरोध केल्याबद्दल त्यांनी महामंडळालाही धन्यवाद दिले आहेत.

फ्रान्सिस दिब्रिटो यांच्‍याविषयी...
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा जन्म ४ डिसेंबर १९४३ला वसईत झाला. ‘सुवार्ता’ मासिकाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक प्रबोधन केले. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी त्यांनी चळवळ उभारली. ‘तेजाची पावले’, ’सृजनाचा मोहोर’ , ‘सुबोध बायबल’ , ‘नाही मी एकला’ , ‘मुलांचे बायबल’ आदी त्यांची पुस्तके प्रस्तके प्रसिद्ध आहेत. ‘संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची’  हे पुस्तक लिहण्यापूर्वी संशोधन करण्यासाठी ते अनेक महिने इस्रालयमध्ये होतो. त्यांनी मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. ‘सुबोध बायबल’साठी त्यांना २०१३मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. याशिवाय अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

मराठी भाषेच्या संवर्धनात फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे मोठे योगदान आहे. ख्रिस्ती धर्मगुरुला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला, ही त्यांच्या कामाची पोचपावती आहे. ही वसईसाठी अभिमानाची बाब आहे.
- डॉ. सिसिलिया कार्व्हालो, साहित्यिका  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not insist on the freedom of expression of the author fransis dibrito