Vidhan Sabha 2019 : फॅसिस्ट मनोवृत्तीच्या मुस्कटात मारा : जिग्नेश मेवानी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

फॅसीझमविरुद्ध लढणाऱ्या जितेंद्र आव्हाड  यांना रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी करुन फॅसीस्ट मनोवृत्तीच्या मुस्काटात मारा, असे आवाहन  गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी केले.

ठाणे : फॅसीझमविरुद्ध लढणाऱ्या जितेंद्र आव्हाड  यांना रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी करुन फॅसीस्ट मनोवृत्तीच्या मुस्काटात मारा, असे आवाहन  गुजरातचे लढाऊ आमदार जिग्नेश मेवानी यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या निवडणूक प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. कौसा येथील घासवाला कंपाउंड येथे झालेल्या सभेत आंबेडकरी चळवळीतील विचारवंत सुषमा अंधारे उपस्थित होत्या.      

मेवाणी म्हणाले की, नरेंद्र मोदी, अमित शहा हे मुठभर भांडवलदारांचे दलाल आहेत. पाणी, 60 हजार शेतकऱ्यांची झालेली आत्महत्या, रोजगार, महागाई या मुलभूत प्रश्नांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रचार सभेत, 370 कलम, पाकिस्तान, इम्रान खान, मंदिर-मशीद याबद्दल जाणीवपूर्वक बोलतात.

यामुळे सावध होऊन जातीय-धार्मिक झगडे लावणाऱ्यांना, संविधान बदलण्याची इच्छा असणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांना रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी करण्याची आपली जबाबदारी आहे; जितेंद्र आव्हाड यांनी केवळ विकास केला नाही तर सेक्युलर विचारधाराही वाचविण्याचे काम केले आहे. म्हणून आता लढले पाहिजे, असे आवाहन केले. 

सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी आपल्या धडाकेबाज भाषणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले की, उर्मिला मातोंडकर यांच्या निवडणुकीत लव जिहादचा मुद्दा मांडणारे कळवा-मुंब्रा येथे उमेदवार देताना हीच विचारसरणी सरड्यासारखी बदलताना दिसतात. या सरकारच्या काळात बहुमताच्या जोरावर न्यायमूर्तीची हत्या, प्रेसवर निर्बंध, खाण्यापिण्यावर निर्बंध टाकलेत याविरोधात उभे रहाण्याची गरज आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले तर जितेंद्र आव्हाड यांनी मतदानाचा टक्का वाढवून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. 

यावेळी सय्यदअली अशरफ भाईसाब, बबलू सैय्यद, शमीम खान, मुंब्रा परिसराचे नगरसेवक सिराज डोंगरे, राजन किणी, यासीन कुरेशी, अनिता किणी, दिपाली भगत, बाबाजी पाटील, सुनीता सातपुते, अशरीन राऊत, हाफीजा नाईक, साजिया अंसारी, सुलोचना हिरा पाटील, मोरेश्वर किणी, जफर नोमानी, फरजाना शाफिर शेख, जमीला नासिर खान, रुपाली गोटे, नादिरा सुर्मे  आदी मान्यवर उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not tolerate fascist mentality says jignesh mewani