गरजू रुग्णांच्या नावाने पैसे लाटणाऱ्या डॉक्‍टरला अटक 

file photo
file photo

मुंबई : गरजू रुग्णांच्या नावाची बनावट कागदपत्रे सादर करून मुख्यमंत्री सहायता निधीतून लाखो रुपयांची रक्कम लाटल्याच्या आरोपाखाली ठाण्यातील एका डॉक्‍टरला तसेच त्याच्या महिला साथीदाराला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. या दोघांनी दोन वर्षांत 64 रुग्णांच्या नावाने 75 लाख रुपयांची फसवणूक केली. ही माहिती मुख्यमंत्री सहायता निधी विभागाला मिळाल्यानंतर झालेल्या चौकशीत ही बाब उघड झाली. त्यानंतर या विभागाच्या सहायक संचालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.

डॉ. अनिल हरिश नागराळे-पाटील (40) असे या डॉक्‍टरचे नाव आहे. तो ठाण्यातील एका प्रतिष्ठित रुग्णालयात जुलै 2017 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत भागीदार होता. याप्रकरणी पोलिसांनी त्याला शुक्रवारी अटक केली. त्याला 30 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आरती शिगवण या त्याच्या महिला साथीदारालाही पोलिसांनी रविवारी गजाआड केले. तिनेच नागराळेला हा फसवणुकीचा मार्ग दाखवला होता. फसवणुकीतून मिळणाऱ्या निधीतील 60 टक्‍क्‍यांहून अधिक वाटा या महिलेला मिळत असे.

मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत हृदयरोग, कर्करोग, बोन मॅरो या संबंधित आठ दुर्धर आजारांनी ग्रस्त दारिद्य्ररेषेखालील कुटुंबातील रुग्णांना मदत केली जाते. गंभीर आजारामुळे अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या लहान मुलांनाही या निधीतून पैसे दिले जातात. त्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा सरकारने उपलब्ध केली आहे. शिगवणचे नेहमी मंत्रालयात येणे-जाणे असल्यामुळे तिला या योजनेबाबतची माहिती होती. जुलै 2017 मध्ये तिने नागराळेला हाताशी घेऊन फसवणुकीला सुरुवात केली. ते दोघे नागराळेच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची बनावट फाईल तयार करत. त्यानंतर या रुग्णांच्या नावे मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवत. अनेकदा रुग्णांची बनावट फाईलही बनवत असत. 
.... 
दोन रुग्णांवरील संशयावरून बिंग फुटले 
मुख्यमंत्री सहायता निधी विभागाकडे अर्ज आलेल्या दोन रुग्णांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी प्रथम दूरध्वनी व नंतर नागराळेच्या ठाण्यातील रुग्णालयात जाऊन तपासणी केली. त्यानंतर नागराळे याने त्या रुग्णालयातील भागीदारी सोडली. अधिकाऱ्यांनी रुग्णालयाची दुसरी भागीदार डॉक्‍टर भाविका पटेल यांच्याकडे चौकशी केली असता असे रुग्णच तेथे उपचार घेत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हा प्रकार उघड झाला. अधिकाऱ्यांनी त्या रुग्णालयाकडून आलेल्या जुन्या अर्जांची पडताळणी केली असता नागराळे आणि शिगवण यांनी जुलै 2017 पासून 64 बोगस रुग्णांच्या नावाने 75 लाख रुपयांचा मदत निधी लाटल्याचे उघड झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com