पालिकेत पाठवा डॉक्‍टर नगरसेवक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

सर्वच पक्षांतील उमेदवारांच्या समर्थकांनी प्रचार करताना अनेक क्लृप्त्या सुरू केल्या आहेत...

ठाणे - खासदार डॉक्‍टर चालतो, आमदार डॉक्‍टर चालतो; मग डॉक्‍टर नगरसेवक का नको, अशा घोषणा सोशल मिडीयावर दिसत आहेत. कळवा खारीगावातील प्रभाग क्रमांक ९ मधून निवडणुकीच्या रिंगणात प्रमुख पक्षांकडून डॉक्‍टर, इंजिनिअर उमेदवारांना उतरवले आहे.

पालिकेच्या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा आढावा घेतला असता कमी शिकलेल्या अथवा यशवंतराव मुक्त विद्यापीठातून पदवी घेणाऱ्या उमेदवारांना सर्वच पक्षांनी प्राधान्य दिल्याचे दिसते. कळवा परिसरात भाजपकडून डॉ. संतोष जोशी, तर शिवसेनेने निवडणुकीच्या रिंगणात विद्यमान नगरसेवक उमेश पाटील यांना उतरवले आहेत. याच ठिकाणी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणारे श्‍याम पाटील राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरले आहेत.सर्वच पक्षांतील उमेदवारांच्या समर्थकांनी आपल्या उमेदवारांचा प्रचार करताना अनेक युक्‍त्या सुरू केल्या आहेत. त्यातही सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यामध्ये स्थानिकांचे प्रश्‍न मांडण्याबरोबरच आपलाच उमेदवार कसा चांगला हे ठासून सांगितले जात आहे. कळव्यामधील या निवडणुकांमध्ये भूमिपुत्र विरुद्ध परके असा एक वेगळाच रंग दिसत आहे. हा मुद्दा लक्षात घेऊन सोशल मीडियावर निवडणुकीचा प्रचार होत आहे. त्यातूनच स्थानिक राजकारणात आपल्याला स्थान नसल्याची येथे स्थानिक झालेल्या बाहेरील नागरिकांमधील नाराजी सोशल मीडियावरील चर्चेतून व्यक्त होत आहे. त्यातूनच  तुमचे खासदार डॉक्‍टर, तुमचे आमदारही डॉक्‍टर तुम्हालाही हवा नगरसेवक डॉक्‍टर, असे संदेश व्हायरल होत आहेत.

Web Title: Doctor corporator send municipal